स्वच्छता मोहीम गतिमान करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:32+5:302021-04-04T04:29:32+5:30
पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी बल्लारपूर : जिल्ह्यातील अनेक गावात पाणीपुरवठ्याची बोंब आहे. पाण्याच्या टाक्या असून त्या शोभेच्या वास्तू ठरल्या ...
पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी
बल्लारपूर : जिल्ह्यातील अनेक गावात पाणीपुरवठ्याची बोंब आहे. पाण्याच्या टाक्या असून त्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. पाणीपुरवठा योजना मंजूर असतानाही पाणी मिळत नसल्याने अनेक गावातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे. उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची गरज जास्त आहे.
शेतीपूरक योजना गावात पोहोचविण्याची गरज
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील जनता शेतीवरच अवलंबून आहे. दरवर्षीच अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. कृषी व अन्य विभागाच्या योजना गावात न आल्याने शेतकरी निराश आहे.
डास प्रतिबंधक फवारणीची मागणी
जिवती : परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने डास प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पूर्वी गावागावात कीटकनाशकाची फवारणी करण्यात येत होती.
कातलाबोडीसाठी बस सुरू करण्याची मागणी
कोरपना : येथून कातलाबोडी गावाला जाण्यासाठी बस नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर खासगी वाहने उपलब्ध नसल्याने नागरिकांना पायी जावे लागते. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन बस सुरू करावी, अशी मागणी आहे.
अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका
नांदा : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या व वाहने वाढली. या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. अनेकजण वाहतूक नियमांचे उल्लघन करतात.
खडसंगीत पाणीपुरवठा अवेळी
खडसंगी : मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र वेळी- अवेळी नळ सोडण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी सकाळी पाणीपुरवठा केला जात होता. आता कधी सकाळी तर कधी सायंकाळी पाणी सोडले जात असल्याने अडचण जात आहे.
पोलीस पाटलांची रिक्त पदे भरावे
सावली : सर्वसामान्यांच्या समस्यांचे गावातच निराकरण व्हावे, हा एकमेव हेतू समोर ठेवून शासनाने गावागावांत पोलीस पाटील पदाची निर्मिती केली. परंतु, तालुक्यातील अनेक गावांतील पोलीस पाटलांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पोलीस पाटील पद तत्काळ भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.