बल्लारपुरात स्वच्छतेची लोकचळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:12 AM2018-01-22T00:12:30+5:302018-01-22T00:13:04+5:30
नगरपालिका प्रशासनान बल्लारपूर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियान प्रभावीपणे राबवत आहे.
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : नगरपालिका प्रशासनान बल्लारपूर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियान प्रभावीपणे राबवत आहे. यामुळे निरोगी व निरामय जीवन जगण्याची संकल्पना साकारण्यासाठी व स्वच्छतेचे महत्त्व जनमाणसात रूजविण्यासाठी शुक्रवारी स्वच्छतेचा संदेश देणारी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये नगरपालिका प्रशासनातील जनप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनी सहभागी झाले. बल्लारपूरकरांचा प्रतिसाद मिळाल्याने स्वच्छतेसाठी लोकचळवळ अवतरली असल्याचे मिरवणुकीवरुन दिसून आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी नगर प्रशासन प्रयत्न करीत आहे. यातून व्यापक लोकचळवळ निर्माण करण्याचा संकल्प मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी केला. जनप्रतिनिधी व लोकांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा स्वच्छता अभियानाच्या आवाहनाला प्रतिसादही मिळत आहे. स्वच्छतेची जनजागृती व्यापक प्रमाणात करण्यासाठी निबंध स्पर्धा, भिंंती चित्र स्पर्धा, घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात गोळा करणे, प्लास्टिक बंदी आदी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. स्वच्छतेचा बल्लारपूर पॅटर्न साकारण्यासाठी जनप्रतिनिधीसह साºयांचा सक्रीय सहभाग घेण्यात आला.
बल्लारपूर शहर प्रदूषण मुक्त व स्वच्छ, सुंदर करण्यासाठी व स्वच्छतेची मोठ्या प्रमाणात जागृती करण्यासाठी शुक्रवारी स्वच्छतेचा संदेश देणारी मिरवणूक शहरात काढण्यात आली. रॅलीत विविध प्रकारचे जागृती करणारे संदेश, फलक, संगणकीय सादरीकरण करण्यात आले. स्वच्छता अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभागाला स्वच्छतेची योग्य दिशा देण्याचा प्रयत्न स्वच्छता संदेश रॅलीतून करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, उपमुख्याधिकारी अभिजीत मोटघरे, नगरसेवक सारिका कनकम, येलय्या दासरात, आशा संगीडवार आदी उपस्थित होते.
नगरपालिकेची दंडात्मक कारवाई
नगरपालिका प्रशासनान शहरात स्वच्छता अभीयान सर्वेक्षण २०१८ प्रभावीपणे राबवित आहे. दररोज स्वच्छतेची जागृती केली जात आहे. परंतु, शहरातील काही व्यापारी प्रतिष्ठाने स्वच्छता अभीयानाला प्रतिसाद देत नाही. दुकानासमोरील परिसर स्वच्छ ठेवत नाही. प्लास्टिकवर बंदी असूनही जुमानत नाही. अशांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया शनिवारी मुख्याधिकारी विपीन मुद्धा, विजय जांभूळकर, शब्बीर अली, दिलीप परसोतवार, शीतल हाडके यांच्या पथकाने कलामंदिर परिसरातील दुकानदारांवर केली. प्रत्येक दुकानदारांनी प्रतिष्ठानासमोर कचरापेटी ठेवण्याचे निर्देश नगरपालिकेनी दिले.