स्वच्छ भारत अभियानात शौचालये हरविले
By admin | Published: November 22, 2014 12:29 AM2014-11-22T00:29:00+5:302014-11-22T00:29:00+5:30
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची सुरुवात केली.
राजकुमार चुनारकर खडसंगी
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची सुरुवात केली. मोठमोठे सिलेब्रिटीज, पुढाऱ्यांपासून तर गावखेड्यातील सरपंच्यानी सुद्धा हातात झाडू घेवून देश स्वच्छ करण्याकडे निघाले आहेत. मात्र, निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त गावात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असलचयाने चिमूर तालुक्यातील शौचालय स्वच्छ भारत अभियानातही हरविलेत काय? असे चित्र दिसत आहे.
मागील सरकारने स्वच्छतेकडून समृद्धीकडेचा नारा देत स्वच्छता अभियान राबवून ग्रामीण भागातील दुर्गंधी दूर करण्याचा प्रयत्न चालविला होता. नंतर याही पुढे जात हागणदारी मुक्त गाव अभियान राबविले. या अभियानामध्ये अनेक गावांनी सहभाग दर्शविला व निकष पूर्ण करुन हागणदारी मुक्तीचे पुरस्कार मिळविले होते. मात्र, आता याच गावांत अस्वच्छता दिसून येते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान सुरु करुन शासनाने ग्रामीण भागात नागरिकांना स्वच्छतेचे धडे दिलेत. यामध्ये राज्यातील अनेक गावांनी स्वच्छता अभियानाचे शासनाकडून देण्यात येणारे पुरस्कार मिळविले. या अभियानादरम्यान तालुक्यात चांगले काम करुन अभियानातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता अभियानाचे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आले.
ग्रामस्वच्छता अभियानानंतर शासनाने २००६-०७ पासून हागणदारी मुक्त (निर्मलग्राम) योजना सुरू केली. या अभियानामध्ये ग्रामपंचायत स्तरावर १०० टक्के शौचालय व उघड्यावर शौचास न जाणाऱ्या गावांना हागणदारी मुक्त पुरस्कार देण्यात आले. हागणदारी मुक्त अभियानामध्ये चिमूर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतीपैकी बऱ्याच ग्रामपंचायती हागणदारी मुक्त अभियानामध्ये सहभागी झाल्यात.
या अभियानात सहभागी झालेल्या तालुक्यातील शिवारपूर, बंदर, शेडेगाव, हिवरा, बोडधा व सावरगाव या गावांना हागणदारी मुक्तीचा ५० हजार ते १ लाख रुपयांचा पुरस्कार राज्याचे पुढारी व अधिकारी यांच्या हस्ते ग्रामपंचायत सचिव, सरपंच यांना देऊन सत्कार करण्याता आला. हागणदारी मुक्त अभियाना दरम्यान तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये अभियान सुरु असतांना शौचालय असल्याचे दाखविण्यात आले. काही काळासाठी गावातील पांदन रस्ते स्वच्छ झाले. मात्र हागणदारी मुक्तीचा हा संकल्प क्षणाभंगुर ठरला. आजघडीला तालुक्यातील हागणदारी मुक्तीचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसत आहे. हागणदारी मुक्त पुरस्कार प्राप्त गावात आजघडीला गावाच्या शिवेवर हागणदारी मुक्त फलक दिसतो. त्यापुढे गेल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूला चित्र वेगळे दिसते. पुरस्कार घेणाऱ्या गावात तरी बाहेर शौचास जाणाऱ्यांची संख्या नगण्य असायला हवी होती. मात्र पुरस्कार प्राप्त शिवापूर, बंदर, शेडेगाव, बोडधा, हिवरा व सावरगाव या गावात हागणदारीचे विदारक चित्र बघायला मिळत आहे. गावात स्वच्छता राहावी, १०० टक्के शौचालयाचा वापर व्हावा याकरिता शासनाने लाखो रुपये खर्च केले होते.