भद्रावतीच्या गुरुदेव भक्तांकडून पंढरपुरात स्वच्छता
By admin | Published: August 1, 2016 12:37 AM2016-08-01T00:37:43+5:302016-08-01T00:37:43+5:30
पंढरपूर येथे पार पडलेल्या आषाढी एकादशी महोत्सवात संपुर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली.
भद्रावती : पंढरपूर येथे पार पडलेल्या आषाढी एकादशी महोत्सवात संपुर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. त्यामुळे पंढरपुरात निर्माण झालेला घान, कचरा साफ करण्यासाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात भद्रावती येथील स्थानिक श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून योगदान दिले.
श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा जीवन प्रचारक जगन्नाथ गावंडे, बालाजी नागपुरे यांच्या नेतृत्वात भद्रावती, वरोरा, कोरपनासह चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास १०० कार्यकर्ते पंढरपुरात दाखल झाले. तसेच संपुर्ण महाराष्ट्रातून ४५० ते ५०० कार्यकर्त्यांनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला होता. त्यात महिलांचा सुद्धा समावेश होता. वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत १२ व्या अध्यायात ग्रामस्वच्छतेचे महत्त्व सांगितले. त्यांच्या या विचाराला अनुसरून मागील वर्षापासून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने पंढरपुरात आषाढी एकादशी महोत्सव संपल्यानंतर हे स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प केला. त्यामुळे शहराची स्वच्छता करण्यासाठी स्थानीक प्रशासनाला चांगलीच मदत झाली.
या अभियानात रोज सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत परिसर स्वच्छता करण्यात आली. त्यात मंदिर, चंद्रभागा परिसर, सोलापूर रोड, गोपालपूर रोड, सांगली रोड, हनुमान मंदिर स्वच्छ करण्यात आले. हे अभियान सेवकराम मिलमिले यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले.
श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला नारखेडे दादा, वैद्य गुरुजी, सुरेश चौधरी, काळे गुरुजी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)