स्वच्छता झाली, पण वाद कायमच

By admin | Published: January 15, 2016 01:37 AM2016-01-15T01:37:10+5:302016-01-15T01:37:10+5:30

‘लोकमत’ गेल्या तीन दिवसांपासून चालविलेल्या लेखन मोहीमेनंतर अखेर गुरूवारी मनपाला जाग आली.

Cleanliness came, but the disputes were always there | स्वच्छता झाली, पण वाद कायमच

स्वच्छता झाली, पण वाद कायमच

Next

रामू तिवारींचा पुढाकार : अखेर कन्नमवारांचा पुतळा परिसर स्वच्छ
चंद्रपूर : ‘लोकमत’ गेल्या तीन दिवसांपासून चालविलेल्या लेखन मोहीमेनंतर अखेर गुरूवारी मनपाला जाग आली. अगदी सकाळी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वसंत भवन समोरील पुतळा परिसरात जावून संपूर्ण स्वच्छता केली. त्यामुळे गेले तीन दिवसांपासून कन्नमवारांच्या पुतळा स्वच्छतेवरून सुरू असलेला वाद थंडावला आहे, असे असले तरी पुतळा कुणाच्या कक्षेत आणि स्वच्छ करण्यासाठी पुढकार कुणी घ्यावा, यावरील वाद मात्र कायमच आहे.
महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी यांनी पुतळा स्वच्छता प्रकरणात स्वत: पुढाकार घेतला. मनपाच्या पुतळ्याची महानगर पालिककेडून झालेल्या अवहेलनेबाबत खेद व्यक्त करीत त्यांनी सकाळी स्वच्छता विभागाची चमू पाण्याच्या टँकरसह रवाना केली. सफाई कामगारांच्या चमूने सकाळी ११ वाजेपर्यंत या पुतळ्याचा परिसर स्वच्छ केला. झुडूपे उपडून काढली. पुतळा पाण्याने स्वच्छ केला. समोर ऊभ्याआडव्या वाढलेल्या कडूलिंबाच्या झाडाच्या फांद्या छाटून काढल्या. या परिसरात लावण्यात आलेले बॅनरही हटविले.
मनपाने उशिरा का होईना पण पुतळा स्वच्छ करण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गुरूवारी या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी क्षणभर थांबून पुतळा परिसरात स्वच्छतेमुळे घडलेला बदल अनुभवला. जिल्हा बेलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही याबद्दल समाधान व्यक्त केले असून एवढ्या क्षुल्लक कामासाठी महापौरांनी चार दिवस लावावे, ही बाब अशोभनिय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनीही ‘मनपाला जाग आली असेच समजावे’, अशा मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. यापुढे महानगर पालिकेने या पुतळ्याच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलावी आणि भविष्यात असा अपमानजनक प्रसंग टाळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया यांनीही लोकमतच्या भूमिकचे अभिनंदन करीत पुतळा स्वच्छ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तर, महापौरांनी हा वाद उगिचच चिघळविल्याचा आरोप करीत, या स्वच्छेसाठी चार दिवस लावण्याची गरज काय होती, असा प्रश्न मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नंदू नागरकर उपस्थित करीत लोकमतच्या खंबीर भूमिकेचे कौतूक केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

रमेश कोतपल्लीवार म्हणतात, जिल्हा परिषदेने पत्र द्यावे
कर्मवीर दादासाहेब कन्नमवारांचा पुतळा कुणाच्या हद्दीत येतो आणि त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी कुणाची या वादात गुरूवारी माजी नगराध्यक्ष रमेश कोतपल्लीवार यांनी उडी घेतली. ‘लोकमत’कडे आपली प्रतिक्रिया कळविताना ते म्हणाले, जिल्हा परिषदेने १९७० मध्ये हा पुतळा उभारला. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अब्दूल शफी होते, तर आपण नगराध्यक्ष होतो. याच वर्षी महात्मा गांधी जन्मशताब्दी समिती गठीत करण्यात आली. त्याचे अध्यक्ष अब्दूल शफी होते, तर आपण सचिव होतो. जिल्हा परिषदेने पुतळा उभारल्यावर तत्कालिन नगर पालिकेने कंपाऊंड करून दिले. मात्र असे असले तरी पुतळ्यावर मालकी हक्क जिल्हा परिषदेचाच आहे. आपली ही तांत्रिक माहिती पूर्णत: खरी असल्याचा दावा करून ते म्हणाले, पुतळा जिल्हा परिषदेचा आहे, त्यामुळे जबाबदारी त्यांचीच आहे. त्यामुळे पुतळ्याच्या स्वच्छतेसाठी त्यांनी महानगर पालिकेला पत्र देणे हा यातील तांत्रिक मार्ग आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकमतचे आभार
कर्मवीर मा.सा. कन्नमवारांच्या पुतळ्याच्या अवहेलनेची दखल घेऊन ‘लोकमत’ने ११ जानेवारीपासून या संदर्भात वृत्तलेखन चालविले होते. पत्र आल्याशिवाय स्वच्छता करणार नाही अशी भूमिका घेतलेल्या महापौर राखी कंचार्लवार अखेरपर्यंत आपल्या भूमिकेवर अडून होत्या. त्यामुळे समाजमनात प्रचंड रोष निर्माण झाला होता. गुरूवारी केले, तेच पहिल्या दिवशी केले असते, तर महानगर पालिकेची नाचक्की टळली असती, असाही सूर आज गुरूवारी समाजमनात व्यक्त झाला. मनपाच्या या एकांगी भूमिकेबद्दल समाजाच्या अनेक क्षेत्रातून टिकेचा सूर उमटला होता. माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी तर मनपाकडे पुतळा स्वच्छतेसाठी पैसा नसेल तर सांगावे, आपण देऊ, असे सांगून कानपिचक्या घेतल्या होत्या. ‘लोकमत’ने हा प्रश्न सातत्याने लावून धरल्यावर अखेर आज स्वच्छता झाली. याबद्दल अनेकांनी लोकमतच्या भूमिकेचे कौतूक केले आणि आभार मानले.

Web Title: Cleanliness came, but the disputes were always there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.