पहाटेपासून स्वच्छता मोहीम
By admin | Published: May 7, 2017 12:37 AM2017-05-07T00:37:22+5:302017-05-07T00:37:22+5:30
देसाईगंज तालुका गोदरीमुक्त झाल्याचे सुतोवाच केले जात असले तरी कुरूड येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते.
विकासाची सुरूवात : कुरूड येथे महिलांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज तालुका गोदरीमुक्त झाल्याचे सुतोवाच केले जात असले तरी कुरूड येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचेही प्रमाण येथे अधिक आहे. या गंभीर बाबीकडे स्थानिक प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले. ही बाब महिलांच्या लक्षात आल्यानंतर गावातील दारूबंदी महिला समितीने पुढाकार घेऊन पहाटेपासूनच स्वच्छता अभियान राबवून गावात विकास कामांचा पाया घालण्यास सुरूवात केली आहे.
परिसरातील सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळख असलेल्या कुरूड येथे शंकरपटानिमित्त एकाच रात्री आठ ते दहा नाटकांचे प्रयोग सादर केले जातात. त्यामुळे पूर्व विदर्भात गावाचा नावलौकिक पूर्वीपासूनच आहे. सध्या गावाची लोकसंख्या ६ हजार ५०० च्या आसपास आहे. गावात सर्वच मोठ्या एकोप्याने उत्साहात साजरे होते. मात्र विकासात्मक दृष्टीने गावाचा विचार केला तर गावात अनेक समस्या असल्याचे दिसून येते. गावातील दारूबंदी व अवैैध धंदे बंद करण्याकरिता पुढे सरसावलेल्या महिलांना अनेक चढाओढींचा सामना करावा लागत आहे. परंतु ग्रा. पं. पदाधिकारी, तंमुस पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. विविध विकासकामे करताना महिलांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यांना मदत करण्यास कुणीही धजावत नसल्याचे दिसून येते. १ मे रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत महिलांनी सदर मुद्दा उपस्थित केला असता, सहकार्य करण्याचे आश्वासन ग्रा. पं. ने दिले होते. गावात स्वच्छता ठेवण्यासाठी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा भजनदिंडीच्या गजरात स्वागत करण्याचाही निर्णय घेण्यात आला. गावातील महिला श्रमदानातून पहाटेपासूनच गावाची स्वच्छता करीत आहेत.