चुना टाकून रामाळा तलावाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:09 PM2017-11-28T23:09:17+5:302017-11-28T23:09:56+5:30
येथील गोंडकालीन रामाळा तलावात दरवर्षी निर्माल्य व इतर साहित्य टाकले जात असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : येथील गोंडकालीन रामाळा तलावात दरवर्षी निर्माल्य व इतर साहित्य टाकले जात असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. या अस्वच्छतेमुळे तलावाचे पाणी दूषित झाले. याची दखल घेत तलावाच्या स्वच्छतेसाठी वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्था चंद्रपूरच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे. तलावाच्या पाण्यात चुना टाकून पाणी शुद्ध केले जात असून कचराही काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
रामाळा तलाव स्वच्छ दिसावा म्हणून संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य २३ नोव्हेंबरपासून चुना टाकण्याच्या कामाला लागले होते. संस्थेचे सभापती जगन पचारे, बंडू हजारे, संतोष झा, लक्ष्मण तोकला, किसन पचारे, शंकर बक्कलवार, देवराव मंचर्लावार, दीपक पचारे, वसंता पचारे, देविदास पचारे, रोशन कार्लेकर, राहुल बक्कलवार, राजेश येल्लेवार, उमेश तोक्कलवार, पांडुरंग गावतुरे, आनंदराव कस्तुरे, रवी मंचर्लावार, अशोक दडगेलवार व इतर सदस्य या अभियानात सहभागी झाले.
चंद्रपूर शहरात एकमेव गोंड राजाने बांधून ठेवलेला रामाळा तलाव उरला आहे. त्याची निगा राखण्याचे काम शासन-प्रशासनाचे आहे. मात्र प्रशासनाची प्रतीक्षा न करतान मच्छिमार भोई समाजाने तलवाच्या स्वच्छतेला सुरूवात केली आहे. रामाळा तलावात इकार्निया वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्याचप्रमाणे नागरिक प्लॉस्टिकमध्ये भरुन पुजेचे निर्माल्य टाकत असतात.
तलावाचे सौंदर्यीकरण झाले तेव्हापासून सायंकाळी फिरण्यास मोठ्या प्रमाणात नागरिक येथे येत असतात. मात्र खाऊच्या पिशव्या तलावात टाकतात. तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात कचरा वाढून झाडे झुडूपेही वाढली. ते साफ करण्याचे काम नेहमी केले जात आहे.
शासनाने मदत द्यावी
गणेशोत्सव व दुर्गाविसर्जनानंतर वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेच्या पदाधिकाºयांकडून तलावाची स्वच्छता केली जाते. यात अनेक भोई समाजबांधव सहभागी होतात. मात्र हे काम करित असताना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे मच्छुआ सहकारी संस्थेच्या सभासदांवर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे शासनाने संस्थेच्या पदाधिकाºयांना मोबदला द्यावा, असे पांडुरंग गावतुरे यांनी म्हटले आहे.