‘स्वच्छता ही सेवा’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:48 PM2018-09-15T22:48:44+5:302018-09-15T22:49:15+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र वढा या गावातून करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपुर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र वढा या गावातून करण्यात आला.
नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतची व्यापक जनजागृती करण्यासाठी सर्वांना स्वच्छतेची शपथ देऊन ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाअंतर्गत स्वच्छ आरोग्यपूर्ण आणि नवीन भारताच्या निर्मितीसाठी पूर्ण निष्ठेने आपला परिसर, कार्यालय, सार्वजनिक स्थळी स्वच्छता ठेवण्याचा तसेच स्वच्छतेची आवड अधिकाधिक निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सर्वांनी संकल्प करावा. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १५ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २०१८ या कालावधीत यशस्वीरित्या राबवावयाचे आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालये, शाळा, गावांमधील परिसर स्वच्छ सोयींयुक्त करण्यासाठी या अभियानात प्रत्येकाने सक्रियरित्या सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व गावे स्वच्छ करण्याच्या दृष्टीने या अभियानांतर्गत ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामविकास अधिकारी, गटसमन्वयक, समुहसमन्वयक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, रोजगार सेवक हे या अभियानाचे संवादक म्हणून गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतींचे सदस्य, सरपंच, विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्व पटवून देत या अभियानात होणाऱ्या विविध उपक्रमात सर्वांना उत्स्फुर्तपणे सहभागी करुन घेण्यात येणार आहे.
गाव आणि तालुका पातळीवर स्वच्छता मेळाव्याचे आयोजन, शौचालयांना शंभर टक्के वापर करणाºया ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, गावकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. गृहभेटी अंतर्गत आंतरव्यक्ती संवादातून उदबोधन, शौचालय वापर, ग्रामस्तरीय वातावरण निर्मितीसाठी ग्रामसभा घेणे, कलापथकाच्या माध्यमातून लघुपट दाखविणे, शालेय विघ्यार्थ्यांची गावातुन स्वच्छता फेरी, गावातील ग्रामस्थांनी गावातच श्रमदान करणे, गावातील सार्वजनिक शौचालय, बसस्थानक, बाजाराची ठिकाणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या स्रोतांचे परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. जनजागृतीवर प्रामुख्याने भर देऊन शालेय स्वच्छता दूत, पाणी व स्वच्छता या विषयांवर वक्तृत्व व निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, या विविध उपकमांचे आयोजन जिल्हा परिषद यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
स्वच्छतेची चळवळ निर्माण व्हावी
मागील काही वर्षात जिल्ह्यातील गावागावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. शासनाने अतिशय गंभीरतेने यात लक्ष घालून संबंधित प्रशासनाला कामाला लावले आहे. त्यामुळे गावागावात काही प्रमाणात स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी आणखी अनेक गावात अद्यापही घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे या विषयावर आणखी काम होणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ वढा या तिर्थक्षेत्रापासून करण्यात आला. स्वच्छता ही राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळे सर्वांनी यात सहभागी होऊन मोठया प्रमाणात लोकसहभाग देऊन व्यापक स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.