चंद्रपूर जिल्ह्यात बैल बाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:19 PM2020-06-06T12:19:22+5:302020-06-06T12:19:51+5:30
पणन संचालनालयाने काही अटी लागू करून चंद्रपूर जिल्ह्यात बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सभापतींना दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलबाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे बैल बाजार भरविण्यास प्रशासनाने बंदी घातली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात थोडी शिथिलता मिळाल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू झाले. मात्र बैल बाजाराअभावी शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली होती. यावर पर्याय म्हणून पणन संचालनालयाने काही अटी लागू करून बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सभापतींना दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलबाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बैलजोडीच्याच सहाय्यानेच शेती करतात. खरीब आणि रब्बी हे दोन्हीही हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी बैलजोडीची अदलाबदल करतात. ज्या शेतकऱ्यांकडे शेतीउपयोगी क्षमता नसलेले बैल नसतात, असे शेतकरी ऐन हंगामात बैल बाजारातून बैल खरेदी करतात. यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले. त्याचा जोरदार फटका बैलबाजाराला बसला. शेतकऱ्यांना ऐन शेतीच्या हंगामात बैल विकत घेण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या मशागतीची कामे कशी करावी, यासाठी धावपळ सुरू केली. बºयाच शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता नसल्याने ते ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करू शकत नाही. असे शेतकरी बाजारातून बैल विकत घेतात. यंदा बैल बाजार बंद असल्याने काही शेतकऱ्यांची मशागतीची कामे अजूनही पूर्ण झाली नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे जिल्ह्यातील बैल बाजार चालविले जातात. यातून बाजार समित्यांना बऱ्यापैकी महसूल मिळतो. कोरोनामुळे समित्यांचेही नुकसान झाले.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बैल बाजार बंद होते. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. मशागतीची कामे कशी करावी, असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडला होता.बैल बाजार सुरू झाल्यास शेती हंगामामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
-दिनेश चोखारे,
सभापती, कृषी उत्पन्नबाजार समिती ,
चंद्रपूर
प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी लागणार
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन पणन संचालनालयाने बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समित्यांना दिल्या. मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रतिबंधात्मक खबरदारीच्या दृष्टीने निर्देश देणार आहे. बैलबाजार चालविणाऱ्या संस्थांना या निर्देशाचे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यात राजुरा, कोरपना, वरोरा, जिवती यासोबतच नागभीड, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने बैलबाजार भरतात.