धानोऱ्यातील ‘फिल्टर प्लांट’ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:53 PM2018-05-16T22:53:19+5:302018-05-16T22:53:19+5:30
चिचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आठ गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी शुद्ध करण्यासाठी धानोरा येथे ‘फिल्टर प्लांट’ लावण्यात आले आहे. सदर प्लांट मागील सहा महिन्यांपासून बंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चिचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आठ गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी शुद्ध करण्यासाठी धानोरा येथे ‘फिल्टर प्लांट’ लावण्यात आले आहे. सदर प्लांट मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यातच दररोज पाईपलाईन लिकेज होण्याचे प्रकार घडत असल्याने परिसरातील आठ गावांमध्ये पाण्याची बोंब सुरु आहे. पाण्यासाठी भटंकती सुरु आहे.
चंद्रपूर तालुक्यातील शेणगाव, वेंढली, चिंचाळा, वांढरी, नागाळा, पिपरी, धानोरा आणि सिदूर गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने चिचाळा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु केली. काही वर्षे सुरळीत चाललेल्या या योजनेला आता ग्रहण लागले आहे. योजनेतील पाणी शुद्ध करण्यासाठी धानोरा येथे फिल्टर प्लांट आहे. मात्र हा प्लांट गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. येथे दोन मोटारपंप होते. त्यातील एक चोरी झाली आहे. सध्या एकच सुरुच आहे. पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नाही. मोटारपंपाच्या शेजारी मातीचा गाळ जमा आहे. त्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा सुरु आहे. फिल्टर प्लांटची देखरेख करण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती करणे आवश्यक होते.
मात्र, येथे कोणत्याही कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली नाही. याकडे प्लांटकडे कुणाचेच लक्ष नसल्याने हा प्लांट बंद स्थितीत आहे. या परिसरात उद्योग आहेत. त्यामुळे जडवाहतूक दिवसरात्र सुरु राहते. पाईपलाईनवरुन वाहने गेल्याबरोबर ती लिक होत आहे. ही समस्या दररोजची असल्याने या आठ गावात सध्या पाण्यासाठी बोंबाबोंब सुरु आहे. शेणगाव, वांढरी येथील पाणीपुरवठा महिन्याभरापासून ठप्प आहे.
अन्य गावातही कमी जास्त प्रमाणावर अशीच परिस्थिती आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्या कक्षात पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, आठही गावच्या सरपंच, सचिवांची बैठक पार पडली.
या बैठकीत सरपंचानी फिल्टर प्लांट, पाईपलाईन लिकेज, एकच मोटारपंप यासह अन्य प्रश्न मांडून अधिकाºयांना हैराण केले. यावेळी सभापती ब्रिजभुषण पाझारे यांनी उपविभागीय अभियंता पराते यांची चांगलीच कानउघाडणी करुन समस्या सोडविण्यास सांगितले.