कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:16 PM2018-04-16T23:16:29+5:302018-04-16T23:17:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सन २००५ पासून विविध पदांवर शेकडो कंत्राटी आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांच्या पुर्ननियुक्ती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची पिळवणूक होणार आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एचआर परफॉर्मन्स इंडिकेटरच्या विरोधात सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूरचे अध्यक्ष राकेश नाकडे, उपाध्यक्ष विकास वाढई, सचिव सचिन पोडे, कार्याध्यक्ष प्रकाश मोहुर्ले, कोषाध्यक्ष चंद्रशेखर लोणारे आदींचा नेतृत्वात आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहे. जोपर्यंत शासनस्तरावर ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत आंदोनल मागे न घेण्यावर कर्मचाऱ्यांरी ठाम आहेत.
२०१२ ला नागपूर अधिवेशन काळात काढण्यात आलेल्या मोर्चात भाजप सरकार सत्तेत आल्यास ग्रामीण आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांना शासनसेवत नियमित करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र आता भाजप सरकार सत्तेत असताना आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी आंदोलन सुरू केले असून कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अशा आहेत मागण्या
शिक्षणाच्या व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेमध्ये बिनशर्त समायोजन करावे, समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन द्यावे, आशा स्वयंसेविका यांना प्रती महिना एकत्रित मानधन देण्यात यावे, सध्या मिळणारे मानधन दुप्पट करण्यात यावे, गटप्रवर्तक यांना २५ दिवसांच्या कामावर आधारीत मोबदला न देता त्यांना एकत्रित मासिक मानधन देण्यात यावे, अशा विविध कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.
६९९ कंत्राटी कर्मचारी
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ६९९ कंत्राटी आरोग्य कर्मचारी आहेत. यामध्ये परिचारीका, अधिपरिचारीका, आरोग्य सेविका, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, डाटा एन्ट्री आॅपरेटर, तालुका समूह संघटक अशा पदांचा समावेश आहे.