ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:33 AM2021-09-09T04:33:54+5:302021-09-09T04:33:54+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे अस्थमा रुग्णांना ...
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे अस्थमा रुग्णांना मोठा धोका निर्माण होताे. अधूनमधून पावसाच्या सरी येतात. त्याचाही परिणाम अस्थमाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना होताे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या, आरोग्याला जपा, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.
पावसाच्या दिवसामध्ये विविध आजार तोंड बाहेर काढतात. विविध रोगांना कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाणदेखील वाढते. विशेषत: या दिवसामध्ये सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे वातावरणात सारखा बदल झालेला दिसतो. या काळात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढतात. काहींना दम्याचा त्रास असल्यास त्यांना तो त्रास वाढतो. लहान मुलांमध्येदेखील आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. विशेषत: प्रतीकारशक्ती वाढविण्यावर भर दिला पाहिजे. दमा आजार असलेल्या रुग्णांनी नियमित औषधोपचार घेतल्यास या आजारापासून काही प्रमाणात सुटका मिळू शकते.
बाॅक्स
ही घ्या काळजी
दमा असलेल्या रुग्णांनी थंड वातावरणात जाऊ नये, आंबट पदार्थ खाणे टाळावे, डाॅक्टरांनी दिलेले औषध नियमित घ्यावे, तसेच सोबत बाळगावे. ज्यांना पंप किंवा नेब्युलायजर देण्यात आले आहे. त्यांनी ते जवळ बाळगावे. संसर्ग होणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.
बाॅक्स
बालकांनाही अस्थमा
बालकांना सर्दी-खोकला होताे. मग दम लागते. अशा स्थितीत थंड वातावरण, पावसात भिजणे, थंड पदार्थ टाळणे तसेच उग्र वासापासून मुलांना दूर ठेवावे. त्रास जाणवत असला तर बालक अस्वस्थ असतात. अशावेळी त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. या दिवसांमध्ये बालकांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना अस्थमा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
बाॅक्स
प्रतिकारशक्ती कमी
रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना अस्थमा तसेच इतर आजाराची लागत अधिक लवकर होते. आपण वारंवार आजारी पडत असाल तर आपली रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, हे जाणून डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. वारंवार सर्दी किंवा थंडी वाटत असेल तर कमी प्रतिकारशक्तीचे लक्षण असू शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
कोट
वातावरणातील बदलामुळे या दिवसांमध्ये अस्थमा रुग्णसंख्या वाढते.
ज्यांना त्रास आहे त्यांनी वेळीच डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. थंड, आंबड पदार्थ खाण्याचे कटाक्षाने टाळावे. दम्याच्या रुग्णांनी आपली औषधे कायम सोबत ठेवावी.-डाॅ. सौरभ राजुरकर
छातीरोगतज्ज्ञ, चंद्रपूर.