जालनानंतर चंद्रपूरमध्ये प्रथमच सीएमपी प्रणाली, शिक्षकांचे वेतन एक तारखेला

By साईनाथ कुचनकार | Published: September 3, 2023 05:03 PM2023-09-03T17:03:26+5:302023-09-03T17:03:38+5:30

शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच व्हावे, यासाठीही शासनस्तरावर अनेकवेळा पाऊल उचलण्यात आले.

CMP system for the first time in Chandrapur after Jalna, salary of teachers on one date | जालनानंतर चंद्रपूरमध्ये प्रथमच सीएमपी प्रणाली, शिक्षकांचे वेतन एक तारखेला

जालनानंतर चंद्रपूरमध्ये प्रथमच सीएमपी प्रणाली, शिक्षकांचे वेतन एक तारखेला

googlenewsNext

चंद्रपूर : राज्यभरातील शिक्षकांचे वेतन एक तारखेला न होता महिनाभरात केव्हातरी होते, यामुळे शिक्षकांना आर्थिक ताण सहन करावा लागतो. यासंदर्भात शिक्षक संघटनांनी शासन, प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन, पत्र पाठविले. दरम्यान, शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच व्हावे, यासाठीही शासनस्तरावर अनेकवेळा पाऊल उचलण्यात आले. मात्र, विविध अडचणींमुळे त्यांचे वेतन एक तारखेलाच होतच नव्हते. दरम्यान, आता सीएमपी प्रणालीचा अवलंब करण्यात आला असून, जालना नंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेने शिक्षकांचे वेतन केले असून एक तारखेलाच बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक पत्र काढून प्राथमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीनुसार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशामध्ये जालना व चंद्रपूर या जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच औरंगाबाद व नागपूर महानगरपालिका, नगरपालिकामार्फत चालविणाऱ्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट २०२३चे वेतन प्रायोगिक तत्त्वावर सीएमपी प्रणालीमार्फत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने वेतन बिल तयार केले आणि या प्रणालीनुसार शिक्षकांचे वेतन केले. यामुळे शिक्षकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. यापूर्वी झेडपीएफ एमएस प्रणालीमुळे मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे जुलै २२चे वेतन ३० जुलै २२ला झाले होते. नंतर मात्र पुन्हा मासिक वेतन नियमितपणे झालेच नाही. तब्बल एका वर्षानंतर आता शिक्षकांचे वेतन एक तारखेला झाले आहे. दरम्यान, या प्रणालीसाठी तंत्रस्नेही शिक्षकांचा फार मोठा वाटा असल्याचे तंत्रस्नेही शिक्षक जिब्राईल पठाण यांनी म्हटले आहे.

सीएमपी प्रणालीमार्फत ऑगस्ट २३चे वेतन १ सप्टेंबर २३ला झाले. या प्रणालीचा अवलंब करून शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला नियमित देणे गरजेचे आहे. यासंदर्भात वेळोवेळी शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर आता शासनाने आदेश दिल्यानंतर सीएमपी प्रणालीनुसार शिक्षकांचे वेतन जमा झाले आहे.
-प्रकाश चुनारकर,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक

काय आहे सीएमपी प्रणाली

सीएमपी प्रणाली म्हणजेच कॅश मॅनेजमेंट प्राॅडक्ट. या प्रणालीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे ऑगस्ट २३ या महिन्याचे मासिक वेतन एक तारखेला बँकेत जमा झाले.

Web Title: CMP system for the first time in Chandrapur after Jalna, salary of teachers on one date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.