शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा सीईओंना घेराव
By admin | Published: October 1, 2015 01:23 AM2015-10-01T01:23:17+5:302015-10-01T01:23:17+5:30
आयटकच्या नेतृत्वात चर्चेसाठी आलेल्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांशी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी चर्चा करण्यास नकार दिल्याने ते याबाबत सीईओंकडे चर्चा करण्यास गेले.
चंद्रपूर : आयटकच्या नेतृत्वात चर्चेसाठी आलेल्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांशी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी चर्चा करण्यास नकार दिल्याने ते याबाबत सीईओंकडे चर्चा करण्यास गेले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी आयटकच्या शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करताच निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्माऱ्यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सीईओंना घेराव घालून त्यांचे वाहन अडविले आणि चर्चा करण्यास भाग पाडले.
प्रशासनाने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या समस्या मागील दोन वर्षापासून सोडविल्या नाहीत व चुकीच्या पद्धतीने कामावरुन कमी केलेल्या कामगारांना अद्यापही कामावर घेण्यात आलेले नाही. तत्कालीन सीईओ सलील यांनी सर्व कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दोन वर्षापूर्वीच दिलेले होते. परंतु मुख्याध्यापकांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही व कामगारांना कामावर घेतले नाही. त्यामुळे सीईओंच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने सर्व कामगारांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेत चर्चेसाठी यावे व त्यामध्ये तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. परंतु पदाधिकारी चर्चेसाठी आले असताना खोटे कारण देऊन शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी काही एक चर्चा न करता सभा तहकूब केली. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सीईओंची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरविले. यासाठी सीईओंना पत्र पाठविले, परंतु सीईओ हे चर्चेसाठी बोलावणी न करताच बाहेर जाण्यासाठी निघाले असता कामगारांनी सीईओंच्या गाडीला घेराव घालून त्यांचे वाहन अडविले आणि चर्चा करण्यास भाग पाडले. शेवटी सीईओंनी जवळजवळ अर्धा तास चर्चा केली. परंतु अद्यापही तोडगा निघालेला नाही. सदर चर्चेकरिता आलेल्यांमध्ये म.रा. शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, संतोष दास आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)