कोळसा घोटाळ्याची सखोल चौकशी करावी
By admin | Published: December 27, 2014 10:48 PM2014-12-27T22:48:54+5:302014-12-27T22:48:54+5:30
महाऔष्णिक वीज केंद्रात कोळशाच्या ट्रकमध्ये माती मिळाल्याने कोळसा घोटाळा उघडकीस आला. याबाबत सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रात कोळशाच्या ट्रकमध्ये माती मिळाल्याने कोळसा घोटाळा उघडकीस आला. याबाबत सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली. यासंदर्भात त्यांनी येथे शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
येथील हिराई विश्रामगृहात महाऔष्णिक वीज केंद्राचे केंद्राचे मुख्य अभियंता बुरुडे यांची भेट घेतली. कोळशाची आवक, वाहतूक, देखभाल, गुणवत्ता नियंत्रण याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. माती नेण्याचा आत्मविश्वास चालकामध्ये येणे म्हणजेच कोळसा घोटाळ्याचे स्वरूप व्यापक असल्याचा पुरावा आहे. केवळ एक ट्रकपर्यंत चौकशी मर्यादीत न ठेवता यापूर्वी मिळालेल्या कोळसा, त्यातून निर्माण झालेल्या विजेचे प्रमाण या सर्व गोष्टीपासून कोळसा घोटाळ्याच्या खोलात जाण्याच्या तसेच यामध्ये गुंतलेल्या महाजनकोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना आमदार कडू यांनी मुख्य अभियंत्यांना दिल्या.
यावेळी चंमऔविनी केंद्र (प्रकल्प) चे मुख्य अभियंता खोकले सुद्धा उपस्थित होते. विस्तारीत युनिट ८ व ९ च्या उभारणीत दोन पटीने जास्त कालावधी लागत आहे. बीजीआर कंपनीच्या दोषपूर्ण कार्यशैलीमुळे या प्रकल्पाच्या उभारणीत विलंब होत आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पामध्ये सिव्हीलची अनेक कामे निकृष्ट दर्जाची असून अपघातांमध्ये दगावलेल्या कामगारांची संख्या चिंताजनक आहे. कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन न करणे, गेटपास नसलेल्या कामगारांना पैसे घेऊन प्रवेश देणे, सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणे अशा अनेक बाबी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमदार कडू यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर वेळीच उचित कारवाई करण्याचे निर्देश आमदार कडू यांनी दिले. या बैठकीमध्ये प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)