गोवरी, पोवनीवासीयांनी पुन्हा रोखली कोळसा वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:00+5:302021-09-19T04:29:00+5:30
गोवरी : बल्लारपूर वेकोलि अंतर्गत गोवरी डीप, पोवनी २ कोळसा खदानीतून होणारी अवजड वाहतूक थांबवण्यासाठी नागरिकांनी ...
गोवरी : बल्लारपूर वेकोलि अंतर्गत गोवरी डीप, पोवनी २ कोळसा खदानीतून होणारी अवजड वाहतूक थांबवण्यासाठी नागरिकांनी अनेकदा चक्काजाम आंदोलन केले. तब्बल सात तास वाहतूक ठप्प झाली होती. वेकोलिचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र दोन दिवसांतच पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीमुळे धुळीचा त्रास सुरू झाल्याने १६ सप्टेंबर रोजी चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर वेकोलिने आश्वासन न पाळल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि पुन्हा शनिवारी सकाळी ११ वाजता गोवरी व पोवनीवासीयांनी राजुरा-गोवरी-कवठाळा या मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
सकाळपासून नागरिकांनी ओव्हरलोड कोळसा वाहतूक रोखून धरली. गावकऱ्यांना दिलेले आश्वासन वेकोलि अधिकाऱ्याने पाळले नाही. त्यामुळे गोवरी येथे सामाजिक कार्यकर्ते भास्कर जूनघरी, तर पोवनी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कावळे यांच्या नेतृत्वातील गावकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या चक्काजाम आंदोलनात वेकोलिच्या पोवनी २ व गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य मार्गावर रस्त्यावर पाणी मारण्याचे व ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले. चौकात सुरक्षारक्षक देण्याचे आश्वासन दिले होते. ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू आहे, तर टँकरने पाणी मारणे बंद आहे. रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. सिक्युरिटी गार्डचा पत्ता नाही. धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. मात्र वेकोलिचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. रस्त्याच्या कडेला झुडपी जंगले वाढलेली आहेत. त्यामुळे वळणावरून येताना समोरचे नागरिक दिसत नाहीत. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. वेकोलिने या मार्गावरील चालणाऱ्या वाहतुकीबाबत दिलेले आश्वासन पाळले नाही तर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून गोवरी, पोवनी येथील गावकरी वेकोलितून सुरू असणारी ओव्हरलोड कोळसा वाहतूक बंद करतील, असा इशारा भास्कर जुनघरी व प्रफुल्ल कावळे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिलेला आहे.
बॉक्स
आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
वेकोलिच्या कोळसा खाणीतून होणारी ओव्हरलोड वाहतूक जीवघेणी आहे. गोवरी-पोवनी-कवठाळा मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांत वाढ झाली आहे. डोळ्यादेखत ओव्हरलोड वाहतूक होत आहे. ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आरटीओ विभागाची आहे. मात्र आरटीओ व पोलीस विभागाचे याकडे कायमचे दुर्लक्ष होत आहे.
180921\img_20210918_162521.jpg~180921\img_20210918_162310.jpg
गोवरी_पोवनी वासियांनी पुन्हा वेकोलिची ओव्हरलोड कोळसा वाहतूक रोखली~गोवरी_पोवनी वासियांनी पुन्हा वेकोलिची ओव्हरलोड कोळसा वाहतूक रोखली