चंद्रपुरातील एकोना खाणीत कामबंद आंदोलन; दोन दिवसांपासून कोळसा वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 03:55 PM2022-03-11T15:55:34+5:302022-03-11T16:35:11+5:30
८ मार्चपासून एकोना खुल्या कोळसा खाणीत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यासोबतच खाणीतून निघणाऱ्या कोळशाला बाहेर नेऊ देण्यास अटकाव करण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांपासून कोळसा बंद पडली आहे.
वरोरा (चंद्रपूर) : तालुक्यातील एकोना येथील खुल्या कोळसा खाणी करिता शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना अधिकाऱ्यांनी गैरप्रकार करून शेतकऱ्यांची तसेच स्थानिक बेरोजगारांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी आक्रमक होऊन सदर अन्यायाविरुद्ध ८ मार्चपासून एकोना खुल्या कोळसा खाणीत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यासोबतच खाणीतून निघणाऱ्या कोळशाला बाहेर नेऊ देण्यास अटकाव करण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांपासून कोळसा बंद पडली आहे.
१ जानेवारी २०२२ पासून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन वेकोलि अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु असे असताना अनेकांना नोकरीत अद्याप सामावून घेण्यात आलेले नाही. अजूनही कोणत्याही गाव विकासासाठी सीएसआर फंडाचा वापर करण्यात आला नाही असा आरोप आहे. त्यामुळे सीएसआर फंड नेमका कुणाच्या घशात घातला असा प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दरबारी प्रश्न मांडणार
वेकोलिने एकोना कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांवर केलेला अन्याय, झालेला व सुरू असलेला भ्रष्टाचार आणि गैरप्रकार या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुंबई येथे जाऊन शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी यावेळी सांगितले.