निवडणुकीत बहुजन-वंचित पॅनलचे गठबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:29 AM2021-01-03T04:29:21+5:302021-01-03T04:29:21+5:30
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस व भारतीय जनता पार्टीनंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या बहुजन समाज पार्टी ...
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस व भारतीय जनता पार्टीनंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या बहुजन समाज पार्टी आणि महाराष्ट्र राज्यस्तरावरील वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण लढत देणार आहेत. तर काही ठिकाणी एकमेकाला समर्थन देऊन सोबत सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेलाही सोबत घेणार आहेत.
सिंदेवाही तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतच्या निवडणुका १५ जानेवारीला होत आहेत. या गावखेड्यातील निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना या राष्ट्रीय-राज्य पातळीवरील पक्षांनी पॅनल उभारून उमेदवार उभे केलेले आहेत. तर दुसरीकडे बसपा व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी सिंदेवाही तालुक्यात काही ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन समाजातील एकगठ्ठा आंबेडकरी मतदारांवर लक्ष वेधले असल्याची गुप्त चर्चा-संवाद व बैठकातून दिसून येत आहे. यामधे सिंदेवाही तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेलाही सोबत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या दोन्ही पक्षातील उमेदवार या सामाजिक संघटनेला सोबत घेऊन मैत्रीपूर्ण लढती देणार आहेत. तर तालुक्यातील ज्या ठिकाणी यांच्यामधील तीनपैकी एक असलेल्या ग्रामपंचायतीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना उर्वरित पक्ष, संघटना आतून वा जाहीरपणे समर्थन देणार आहेत. त्यामुळे या नवीन बहुजन-वंचित-युवा पॅनलमुळे गावखेड्यातील निवडणूक वातावरण वेगळेच वळण घेत असल्याचे चित्र तयार होत आहे.