पूरपीडितांच्या मदतीसाठी सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:09 PM2018-09-03T23:09:53+5:302018-09-03T23:10:14+5:30
केरळ राज्यामध्ये पुराने थैमान घातल्याने प्रचंड प्रमाणात मनुष्य व वित्तहाणी झाली आहे. त्यामुळे पूरपीडितांचे उद्धवस्त झालेले संसार पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य देण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केरळ राज्यामध्ये पुराने थैमान घातल्याने प्रचंड प्रमाणात मनुष्य व वित्तहाणी झाली आहे. त्यामुळे पूरपीडितांचे उद्धवस्त झालेले संसार पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य देण्यात आले आहेत. तसेच शहरवासिसाठी चंद्रपूर फ्लड रिलिफ फंड कमिटीची स्थापना करण्यात आली. या कमिटीच्या माध्यमातून निधी संकलन करुन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सदर निधी केरळ राज्यात पाठविण्यात येणार असल्याने जिल्हावासियांनी मानवीय दृष्टकोनातून जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
स्थानिक आयएमए हॉल येथे पार पडलेल्या बैठकीत चंद्रपूर फ्लड रिलिफ फंड कमिटीची स्थापना करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, मनपा गटनेते राहुल पावडे, मधुसूदन रुंगठा, विजय राऊत, दामोधर मंत्री, रामकिशोर सारडा, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. एम. जे. खान, जार्ज कुट्टी, लोकोज, रितेश तिवारी, राजू पुथूवीट्टील, प्रमोद लुनावत, रघुवीर अहीर यांचेसह मनपा नगरसेवक व विविध संस्था, संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
केरळ फ्लड रिलिफ फंड कमिटी चंद्रपूर या समितीचे गंगा टॉवर्रस, अहीर कॉम्प्लेक्स, कस्तूरबा रोड, चंद्रपूर येथे कार्यालय सुरु करण्यात आले असून पुढील १५ दिवसांत या कार्यालयात मदत निधीचे संकलन करण्यात येणार आहे. संकलीत निधी पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे.
या बैठकीस आयएमए रोटरी क्लब, महेश सेवा समिती, रेल्वे यात्री संघर्ष समिती, एमआयडीसी असोसिएशन, लायन्स क्लब, जेसीस चांदा को आॅपरेटीव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, ट्रान्सपोर्ट असोसिएशन अशा विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.