घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड; शेकडो नागरिक अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेतच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:18 IST2024-09-10T13:17:48+5:302024-09-10T13:18:18+5:30
घरे कोसळली : पंचनामेही झाले; मात्र नुकसानभरपाईचे काय?

Collapse of houses and herds; Hundreds of citizens are still waiting for compensation
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी झळ पोहोचली असून अनेकांच्या घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तालुका प्रशासनाने अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ पंचनामे केले. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याने नागरिक नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे.
मूल तालुक्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीचा जास्त फटका बसला. अनेकांची घरे पडल्याने त्यांच्या निवाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला. नागरिकांना निवाऱ्यासाठी इतरत्र शोधाशोध करावी लागली. अनेकांच्या घरातील अन्नधान्य भिजल्याने वेळेवर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, तर गुरांच्या गोठ्याची पडझड झाल्याने गुरे रस्त्यावर बांधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. तालुका प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ पंचनामे केले. मात्र, पंचनामे करून बराच कालावधी लोटूनही नुकसानभरपाई न मिळाल्याने नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये शासानाप्रती तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. प्रशासनाने त्वरित भरपाई द्यावी.
इतक्या घरांची पडझड
तालुक्यात झालेल्या अतिवष्टीमुळे जवळपास ७४० घरांची, तर ६० गुरांच्या गोठ्यांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून तत्काळ नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, बराच कालावधी लोटूनही अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही.
"अतिवृष्टीमुळे माझी झोपडी पडली. घरातील अन्नधान्य पूर्णतः भिजले. त्यामुळे माझे मोठे नुकसान झाले असून माझ्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने पंचनामे केले. मात्र, अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी."
- राजेंद्र वेट्टी, नुकसानग्रस्त लाभार्थी