१५ दिवसांत १५ लाख जमा करा
By admin | Published: September 21, 2015 12:54 AM2015-09-21T00:54:41+5:302015-09-21T00:54:41+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला महानगरपालिका प्रशासनाने पंधरा दिवसात १५ लाख रुपये जमा करण्यासाठी शनिवारी नोटीस बजावली आहे.
मनपा गंभीर : उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला नोटीस
चंद्रपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला महानगरपालिका प्रशासनाने पंधरा दिवसात १५ लाख रुपये जमा करण्यासाठी शनिवारी नोटीस बजावली आहे. मुदतीत रक्कम जमा न केल्यास बँक गॅरंटी जप्त केली जाईल, असा इशाराही नोटीसतून देण्यात आला.
शहरातील पाणीपुरवठ्याचे कंत्राट उज्ज्वल कंस्ट्रक्शन या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी इरई धरणातील पाण्याची उचल करुन प्रक्रियेनंतर शहराला पाणी पुरवठा करीत असते. मात्र धरणातील पाण्याची उचल केल्यानंतर वापर शुल्क पाटबंधारे विभागाकडे जमा करावे लागते. विधिमंडळात संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थानी उचल केलेल्या पाण्याचे वापर शुल्क पाटबंधारे विभागाकडे जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते.
त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाटबंधारे विभागाकडे रकमा जमा केल्या. पाण्याचे खासगीकरण करणारी चंद्रपूर ही राज्यातील पहिली नगरपालिका होती. त्यानुसार ही रक्कम खासगी पाणीपुरवठा कंपनीने देणे अपेक्षित होते. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने खासगी कंत्राटदारावर मेहेरबानी दाखवत स्वत: १५ लाख रुपये पाटबंधारे विभागाकडे जमा केले.
त्यानंतर कंत्राटदाराला ही रक्कम मनपाकडे जमा करण्यास सांगितले. परंतु, कंत्राटदारांनी मनपाच्या एकाही पत्राला उत्तर दिली नाही किंवा रकमही जमा केली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने शनिवारी नोटीस बजावून १५ दिवसात १५ लाख जमा करावे, अन्यथा बँक गॅरंटी जप्त करण्यात येईल, असे निर्देश दिले. (शहर प्रतिनिधी)