कॉलेज निवडणुकांचा पुन्हा वाजणार बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 02:20 PM2019-06-26T14:20:35+5:302019-06-26T14:20:57+5:30

मागील दहा वर्षांपासून बंद असलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका यावर्षापासून पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणाईची जीएस (जनरल सेक्रेटरी) निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.

College Elections starts again in the state | कॉलेज निवडणुकांचा पुन्हा वाजणार बिगूल

कॉलेज निवडणुकांचा पुन्हा वाजणार बिगूल

Next
ठळक मुद्देकॉलेज कॅम्पसमध्ये रंगणार निवडणुकीचे घमासान

रवी जवळे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दहा वर्षांपासून बंद असलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका यावर्षापासून पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणाईची जीएस (जनरल सेक्रेटरी) निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. विद्यापीठाकडून महाविद्यालय प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयांना या निवडणुका घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचे घमासान रंगणार असून कॉलेज कॅम्पसमध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
महाविद्यालयीन निवडणुकांमुळे तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित होऊन समाजाला त्याचा फायदा होत असतो. भविष्यात चांगला प्रतिनिधी मिळणार असतोे. मात्र या निवडणुकांमध्ये वादावादीतून हिंसक वळण लागत असल्यामुळे मागील दहा वर्षांपासून विद्यापीठ प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडणुका न घेता गुणवत्तेच्या निकषावर निवडला जात असे. मात्र, निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबतच्या विद्यापीठाच्या अनेक वर्षांच्या मागणीला राज्य शासनाने मान्यता दिली. त्यामुळे यंदा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेश विद्यापिठाकडून अखेर देण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी २३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत सहभागी उमेदवारांना अनामत रक्कम म्हणून ५० रुपये भरावे लागणार आहेत. याशिवाय तो मागील वर्षात सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण असणे हे निकष आहेत. विद्यार्थी परिषदेबरोबरच विद्या शाखेच्या प्रत्येक वर्षासाठी विद्यार्थी संख्येवर वर्ग प्रतिनिधीही निवडण्यात येणार असून आरक्षित जागा कोणत्या प्रवर्गातील असेल, हे मात्र जुलै अखेरपर्यंत विद्यापिठाकडून कळविण्यात येणार आहे.
महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थी परिषदेवर एनसीसी, एनएसएस, क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी नामनियुक्त करण्यात येईल. महाविद्यालयीन निवडणुकीवेळी वाद होतात, तरुणांमध्ये मारामारीच्या घटनाही घडत असतात. त्यामुळे राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी या निवडणुका रद्द केल्या होत्या. मात्र विद्यार्थ्यांतील नेतृत्व गुणाला चालना मिळावी, निवडणुक प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी राज्यशासनाने पुन्हा या निवडणुका सुरु करण्याचा निर्णय घेतला.

मतदानातून निवड
प्रत्येक महाविद्यालयातून एक अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि आरक्षित प्रवर्गातील एक असे चार उमेदवार प्रत्यक्ष मतदान घेऊन निवडण्यात येणार आहेत. त्यामध्ये रितसर उमेदवारी अर्ज मागणी, छाननी, अंतिम यादी जाहीर करणे अशा प्रकारे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर फायनल झालेल्या व प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी दोन आठवडयांचा कालावधी देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतदान चार तासात पूर्ण करुन निकाल त्वरित जाहीर करण्यात येईल. विजयी उमेदवाराचे नाव तत्काळ विद्यापिठाला कळविणे बंधनकारक आहे.

अशी असणार आचारसंहिता
निवडणुक काळामध्ये दोन आठवडे आचारसंहिता लागू होणार असून या कालावधीत उमेदवारांना प्रचारासाठी खर्चाची मर्यादा एक हजार रुपये असणार आहे. खर्चमर्यादाओलांडली अथवा ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त फलक लावले तर तो आचारसंहितेचा भंग ठरेल. खर्चाचे विवरण उमेदवाराने स्वयंघोषणापत्राव्दारे सादर करायचे असून ही सर्व निवडणूक प्रक्रिया प्राचार्य अथवा नेमण्यात आलेल्या प्राध्यापकांमार्फत राबवण्यात येणार आहे.

महाविद्यालयीन निवडणुकांमधून नेतृत्व तयार होते. त्यामुळे ही प्रक्रिया नव्या पिढीसाठी अत्यंत फायद्याची आहे. देशाचे मोठे नेते अशाच निवडणुकांमधून तयार झाले आहेत. मात्र शासनाने ही प्रक्रिया बंद करून नेतृत्व निर्माण होणेच बंद केले होते. आता पुन्हा कॉलेजात विद्यार्थी परिषदेच्या निवडणूक घेण्याचा निर्णय विद्यापिठाने घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत आहे.
-समीन केने, बल्लारपूर
माजी सिनेट सदस्य

Web Title: College Elections starts again in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.