महाविद्यालयांच्या प्राचार्याची कार्यशाळा
By admin | Published: July 1, 2016 01:09 AM2016-07-01T01:09:32+5:302016-07-01T01:09:32+5:30
देशाचे भविष्य हे देशातील तरुण पिढीवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्यावर योग्य वयात, योग्य वेळी, योग्य संस्कार होणे गरजेचे असते.
विविध अॅपचेही अनावरण : तरुणांचा सहभाग असलेल्या गुन्ह्यांविषयी दिली माहिती
चंद्रपूर : देशाचे भविष्य हे देशातील तरुण पिढीवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्यावर योग्य वयात, योग्य वेळी, योग्य संस्कार होणे गरजेचे असते. यात महत्त्वाची जबाबदारी ही कुटुंबाची असते. परंतु कुटुंबाव्यतिरिक्तही तरुणांच्या व्यक्तिमत्वाची महत्त्वाची जडणघडण होते ती शाळा व महाविद्यालय येथे. येथेच त्यांना चांगले- वाईट, योग्य- अयोग्य याबाबत जाणीव करुन देण्यात येते. येथेच त्यांची संगत व संगतीमधून व्यक्तिमत्व विकसित होते. त्यातूनच काही यशस्वी होतात. काही अपयशी तर काही गुन्हेगारसुद्धा. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तरुणांच्या व समाजाच्या मधील महत्त्वाची कडी असलेल्या या शिक्षक वर्गालाच मध्यस्थी करीत चंद्रपूर पोलीस अधीक्षक संदीप दीवाण यांनी एक नवीन उपक्रम राबविला.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नामांकित विद्यालय व महाविद्यालयातील प्राचार्यांना एकत्र बोलावून मंगळवारी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ज्यामध्ये तरुणांचा विशेष सहभाग व वापर होत असलेल्या गुन्ह्याशी निगडीत विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर एक दिवशीय कार्यशाळेत सोशल मिडीया, एन.डी. पी.एस. (अंमली पदार्थ) यावर मार्गदर्शन, सोबतच महाराष्ट्र पोलीस दलातर्फे जनसामान्याकरिता व विशेष करुन महिलांना केंद्रस्थानी ठेऊन नव्याने विकसित केलेल्या ‘प्रतिसादद अॅपविषयी माहिती देऊन ते शाळा, महाविद्यालयातील मुलींना तसेच महिला शिक्षक वर्गाला कशाप्रकारे उपयोगी आहे, याबद्दल प्रेझेन्टेशनद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
या एक दिवसीय कार्यशाळेला नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आपल्या वक्तव्यातून ‘संवेदनशिल वयोगटाला योग्य मार्गदर्शन देण्याच्या कार्यात चंद्रपूर पोलीस प्रशासन आपणास सदैव सहकार्य करण्यास सज्ज आहे, असे सांगून सर्व प्राचार्यांना आश्वस्त केले. ते पुढे बोलताना म्हणाले, चंद्रपूर पोलिसांनी आयोजित केलेली ही कार्यशाळा महाराष्ट्रातील पहिली कार्यशाळा आहे. ज्यामध्ये प्राचार्य लोकांना समाविष्ट करण्यात आले. आजच्या गुन्हे प्रकाराचे त्यांना ज्ञान होऊन तेसुद्धा आपल्या स्तरावर उपाय योजना करतील व निश्चितच भरकटू पाहणारा तरुणवर्ग योग्य मार्गदर्शनामुळे सावरला जाईल.
या कार्यशाळेच्या निमित्तानेच प्रतिसाद अॅप, पोलीस मित्र अॅप व वाहनचोरी अॅपच्या प्रचारपत्रकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच प्रत्येक महाविद्यालयातसुध्दा याचे वाटप करण्यात आले. या कार्यशाळेची संकल्पना मांडणारे तथा प्रमुख मार्गदर्शक पोलीस अधीक्षक, चंद्रपूर संदीप दिवाण यांनी सर्व प्राचार्यांना काही सूचना देऊन मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम हे उपस्थित होते. तसेच कार्यशाळेचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्यासह कार्यशाळेचे आयोजक अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस उपअधीक्षक जयचंद्र काठे, सर्व उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी हेसुद्धा हजर होते. प्रतिसाद अॅप, सोशल मिडीया अव्हेअरनेस, यावर मार्गदर्शन सायबर सेलचे प्रभारी विकास मुंढे यांनी केले तर अंमली पदार्थ कायदा व अव्हेअरनेस या विषयावर मार्गदर्शन विरुरचे ठाणेदार शाम गव्हाणे यांनी केले. सदर कार्यशाळेकरिता जिल्ह्यातील सर्व विद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळेच्या निमित्ताने प्राचार्यवर्गानी पोलीस प्रशासनाशी मुक्त संवाद साधला. या कार्यशाळेचा निश्चितच सकारात्मक प्रभाव घडून येईल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)