वसाहतीत घुसला बिबट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:26 AM2018-04-11T01:26:36+5:302018-04-11T01:26:36+5:30
येथील घोडाझरी सिंचन विभागाच्या कार्यालय व वसाहत परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बिबट्या शिरला. त्यामुळे कर्मचाऱ्यांत एकच तारांबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : येथील घोडाझरी सिंचन विभागाच्या कार्यालय व वसाहत परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बिबट्या शिरला. त्यामुळे कर्मचाऱ्यांत एकच तारांबळ उडाली. बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. फटाके फोडण्यात आले. मात्र बिबट्या परिसरातील जुन्या क्वॉर्टरमध्ये लपून बसल्याने कर्मचाऱ्यात दहशत कायम आहे.
घोडाझरी सिंचन विभागाचा परिसर दोन एकरात विस्तीर्ण आहे. येथे शेकडो झाडे व मोडकळीस आलेले क्वॉर्टर आहेत. त्यामुळे जुन्या क्वॉर्टरमध्ये बिबट्या लपून बसल्याची माहिती असून त्याला पकडण्यासाठी वनविभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दोन दिवसापूर्वी याच बिबट्याने हेटी परिसरातील दोन बकऱ्यांवर ताव मारला होता.
घटनास्थळी वनक्षेत्रअधिकारी आर. एस. गोंड, क्षेत्र सहाय्यक एम. एम. करडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने एसटीपीएस चमू सर्च करीत होते. नागरिकांना परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आल्याने नागरिकांची गेटवर गर्दी झाली होती. मात्र बिबट्या परिसरातच असल्याने त्याच्या हालचालीवर वनविभागाची नजर आहे.
उजव्या बाजुला लोनवाही, गडमौशी, जाटलापूर गावे आहेत. डाव्या बाजुला जंगल परिसर आहे. मात्र सिंचन विभागाने संरक्षण भिंत असल्याने त्याला पळता येणे शक्य नाही. त्यामुळे बिबट्याला पकडून जंगलात सोडण्यासाठी भूमिका वनविभागाची आहे. मात्र उशिरापर्यंत बिबट वनविभागाच्या हाती लागला नव्हता.