वरोरा तालुक्यात रंगीत कापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:45 PM2018-01-22T23:45:53+5:302018-01-22T23:46:28+5:30
आजपर्यंत आपण केवळ पांढरा शुभ्र असणाऱ्या कापसाची शेती बघितली आहे. परंतु वरोरा तालुक्यातील चिकणी गावातील एका शेतकऱ्याने रंगीत असलेल्या कापसाची शेती करून कपाशीच्या झाडातून प्रथमच रंगीत कापूस पिकविला आहे.
प्रवीण खिरटकर।
आॅनलाईन लोकमत
वरोरा : आजपर्यंत आपण केवळ पांढरा शुभ्र असणाऱ्या कापसाची शेती बघितली आहे. परंतु वरोरा तालुक्यातील चिकणी गावातील एका शेतकऱ्याने रंगीत असलेल्या कापसाची शेती करून कपाशीच्या झाडातून प्रथमच रंगीत कापूस पिकविला आहे. यातून त्यांना नफाही अधिक मिळाल्याने हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
वरोरा तालुक्यातील चिकणी येथील बालाजी पारधे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. बालाजी पारधे यांनी वर्धा येथील गोखुरी येथून वैजयी देशी वाण असलेल्या कपाशीच्या बियांची खरेदी करून आपल्या चिकणी येथील शेतात ०.१० आर. हेक्टर जागेवर लागवड केली. कपाशीच्या लागवडीपासून फवारणी करताना बालाजी पारधे यांनी रासायनिक खत व कीटकनाशके यांचा वापर टाळला. त्याऐवजी सेंद्रीय खते व रामदेवबाबा निर्मित कीटकनाशकाचा वापर केला. सध्या या कपाशीच्या झाडामधून रंगीत कापूस निघत आहे. सध्या त्यांना दोन क्विंटल रंगीत कापूस निघाला आहे. तो त्यांनी खादी ग्रामोद्योग संघ वर्धा येथे सात हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विकला. परत त्यांना याच पिकातून रंगीत कापूस निघणार आहे. खर्च वजा जाता त्यांना चांगला नफा मिळाल्याचे बालाजी पारधे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चिकणी येथील शेतकरी बालाजी पारधे यांनी रंगीत कपाशीची लागवड केली असून ही लागवड प्रायोगिक तत्वावर असल्याने त्यांना दोन क्विंटल उत्पादन झाले.
- व्ही.आर. प्रकाश,
तालुका कृषी अधिकारी, वरोरा.