शेतात या अन् वांगी मोफत न्या, हताश शेतकऱ्याचं सोशल मीडियावरून आवाहन

By राजेश मडावी | Published: May 16, 2023 04:04 PM2023-05-16T16:04:21+5:302023-05-16T16:04:49+5:30

पूर्व विदर्भात सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढली; मात्र दर घसरल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. मूल तालुक्यात मूल एकमेव ठोक बाजारपेठ आहे

Come to hill farm and get brinjal for free, farmer appeals on social media | शेतात या अन् वांगी मोफत न्या, हताश शेतकऱ्याचं सोशल मीडियावरून आवाहन

शेतात या अन् वांगी मोफत न्या, हताश शेतकऱ्याचं सोशल मीडियावरून आवाहन

googlenewsNext

चंद्रपूर : लागवड खर्च आणि उत्पन्नात ताळमेळच जुळत नसताना सध्या बाजारात दरदिवशी वांग्यांचे दर सपाटून कोसळत आहेत. वांग्याचा दर प्रतिकिलो तीन रुपये झाला . त्यामुळे हताश झालेल्या मूल तालुक्यातील टेकाडी येथील मंगेश पोटवार या युवा शेतकऱ्याने ‘टेकाडीच्या शेतात या अन् वांगी मोफत न्या !’ असा संदेश चक्क सोशल मीडियावरून व्हायरल केला. भाजीपाला शेतकऱ्यांची व्यथा दर्शविणारा हा संदेश सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

पूर्व विदर्भात सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढली; मात्र दर घसरल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. मूल तालुक्यात मूल एकमेव ठोक बाजारपेठ आहे. या बाजारपेठात सध्या वांगी सध्या ३ रूपये प्रतिकिलो असा दर आहे. चवळी शेंगा १० रुपये किलो, भेंडी १५ रुपये किलो, चवळी भाजी सहा जुळ्या १० रुपये असा दर सुरू आहे. भाजीपाल्याच्या दरात दररोज घसरण होत आहे. मूल तालुक्यात वांगी, शेंगा, भेंडी व चवळी भाजी आदी पिके घेतली जातात. टोमॅटो लागवड अल्प प्रमाणात होते. त्यामुळे मूल बाजारपेठेत टोमॅटोची बाहेरून आवक सुरू आहे. त्याचा दरही बरा आहे; मात्र वांगी व अन्य भाजीपाल्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने तोट्याची शेती किती दिवस करायची, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. या हतबलतेतूनच टेकाडी येथील मंगेश पोटवार या युवा शेतकऱ्याने शेतात येऊन वांगी मोफत घेऊन जा, असे आवाहन सोशल मीडियावरून केले आहे.

वांगी उत्पादक शेतकरी म्हणतो....

सरकारचे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात प्रचंड घसरण होत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने शेती परवडण्याजोगी नाही. त्यामुळे हताश झालो. माझ्या शेतातील वांगी मोफत घेऊन जा, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला.
-मंगेश पोटवार, शेतकरी टेकाडी, ता. मूल, जि. चंद्रपूर

Web Title: Come to hill farm and get brinjal for free, farmer appeals on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.