विकेल ते पिकेल योजनेंतर्गत भाजीपाला विक्रीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:14+5:302021-03-05T04:28:14+5:30
कोरपना : तालुक्यातील कुकुडसाथ येथील सरस्वती शेतकरी महिला गटामार्फत विकेल ते पिकेल योजनेंतर्गत अंबुजा फाटा येथे भाजीपाला विक्रीचा ...
कोरपना : तालुक्यातील कुकुडसाथ येथील सरस्वती शेतकरी महिला गटामार्फत विकेल ते पिकेल योजनेंतर्गत अंबुजा फाटा येथे भाजीपाला विक्रीचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना शाश्वत विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी 'विकेल ते पिकेल' या संकल्पनेवर आधारित संत सावता माळी रय्यत बाजार अभियानांतर्गत भाजीपाला विक्रीच्या स्टॉलचा शुभारंभ उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट ग्राहक मिळणार आहे. जे शेतकरी स्वतःहून पालेभाज्या, फळे, ग्राहकांना बांधावर विक्री करतात, त्यांच्यासाठी विक्री व्यवस्था उभारणीसाठी मदत केली जाणार आहे. याप्रसंगी कोरपना तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाले, कृषी साहाय्यक धनंजय भगत, बिबी येथील प्रगतिशील शेतकरी हबीब शेख, कृषिमित्र किशोर निब्रड, अंबुजा फाउंडेशनचे सिद्धू जपलवार व सरस्वती शेतकरी महिला गटाच्या सीताबाई आस्वले, छाया निब्रड, रसिका काकडे आदी महिला शेतकरी उपस्थित होत्या.