वरोरा तालुक्यात सोयाबीन बीजप्रक्रिया मोहिमेचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:37+5:302021-06-11T04:19:37+5:30
वरोरा : तालुक्यात जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची दरवर्षी पेरणी केली जाते. बियाणे क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया ...
वरोरा : तालुक्यात जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची दरवर्षी पेरणी केली जाते. बियाणे क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया न केल्यामुळे वेळेवर बियाणे न उगविणे, किडी व रोगाचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट येते.
त्यामुळे तालुका कृषी अधिकारी, वरोरा कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील सर्वच गावांत मागील आठवड्यात बियाणे उगवण क्षमता तपासणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.
शेतकऱ्यांनी सोयाबीन ग्रामबीजोत्पादनमध्ये घरीच तयार केलेले सोयाबीन बियाणे व कृषी केंद्रातून विकत घेतलेले बियाणे यांच्या घरच्या घरी उगवण क्षमता तपासून बघितल्या. ७० टक्केच्यावर उगवण झालेले बियाणे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास राखून ठेवले.
तालुक्यातील सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी मोहिमेच्या यशस्वीतेनंतर मंडल कृषी अधिकारी, शेगाव कार्यक्षेत्रात मौजा- धानोली व अर्जुनी या गावात सोयाबीन बीजप्रक्रिया मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. साधारणतः शेतकरी सोयाबीनला बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करतात. परंतु कीटकनाशकाची बीजप्रक्रिया न केल्यामुळे मागीलवर्षी खोडमाशी व चक्रीभुंगामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर कीटकनाशकाची बीजप्रक्रिया शेतकऱ्यांसमोर प्रत्यक्ष बीजप्रक्रिया मशीनच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविण्यात आली. सोबतच बिबीएफवर सोयाबीन पेरणी, तणनाशकाचा वापर, खत व्यवस्थापन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन मंडल कृषी अधिकारी, विजय काळे यांनी केले. कृषी सहायक पवन मत्ते यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
===Photopath===
100621\img-20210526-wa0186.jpg
===Caption===
image