तळोधी (बा) येथे व्यावसायिकांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:20 AM2018-01-07T00:20:34+5:302018-01-07T00:20:49+5:30
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ तळोधी (बा.) येथे बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान, येथील कापड व्यापारी अजय पाकमोडे यांना काही लोकांनी दुकानात शिरून मारहाण केली.
आॅनलाईन लोकमत
तळोधी (बा) : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ तळोधी (बा.) येथे बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान, येथील कापड व्यापारी अजय पाकमोडे यांना काही लोकांनी दुकानात शिरून मारहाण केली. याच्या निषेधार्थ तळोधी (बा.) येथील व्यापारी असोसिएशनतर्फे शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.
शनिवारी सकाळी तळोधी (बा.) येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. बंदला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला होता. बंददरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. दुपारी १२ वाजता व्यापारी असोसिएशनतर्फे अप्पर तहसीलदार विक्रम राजपुत यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सादर केले. त्यानंतर तळोधी (बा.) चे ठाणेदार श्रीकांत पांढरे यांनाही व्यापारी असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदू भरडकर, सुनील गुरूनुले, अजय पाकमोडे, नरेंद्र कामडी, युवराज सावरकर, चंदू राऊत, भगवान जीभकाटे, रामरतन जयस्वाल, शंभू बिहारी, जगतसिंह ठाकूर उपस्थित होते.