समिती करणार बनावट प्रमाणपत्रांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:05 PM2018-08-06T23:05:14+5:302018-08-06T23:05:41+5:30

The committee will inquire into the fake certificates | समिती करणार बनावट प्रमाणपत्रांची चौकशी

समिती करणार बनावट प्रमाणपत्रांची चौकशी

Next
ठळक मुद्देजि.प. शिक्षण समितीचा ठराव : शालेय गणवेशाचे पाच कोटी २६ लाख पं. स. ला वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली करणाऱ्या वर्ग एक व दोन मधील शिक्षकांच्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी विशेष चौकशी समितीमार्फत करण्याचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या जि.प. शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. दरम्यान बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या ३१ शिक्षकांची नावे सभागृहात वाचून दाखविण्यात आली. या संख्येत पुन्हा वाढ होऊ शकते, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथमिक) आज सभागृहात दिली. शालेय गणवेशाचे पाच कोटी २६ लाख रुपये जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने रखडलेला हा प्रश्न आता मार्गी निघाला आहे.
जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदलीसाठी शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणल होते़ परिणामी जि.प. शिक्षण समितीच्या आज पार पडलेल्या बैठकीमध्ये हा विषय प्रामुख्याने चर्चेत आला.जि.प. उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती अध्यक्ष कृष्णा सहारे व सदस्य पृथ्वीराज अवथडे यांनी या विषयाकडे लक्ष वेधले. वर्ग एक व वर्ग दोनअंतर्गत बनावट प्रमाणपत्र सादर करुन बदली केलेल्या ‘त्या’ ३१ शिक्षकांवर कारवाई होणार आहे. सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर शिक्षण अधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे यांनी माहिती दिली. या प्रकरणात आणखी काही नावे असून ती अद्याप अप्राप्त आहेत, असेही त्यांनी यावेळी नमुद केले. दरम्यान शिक्षण क्षेत्रात असे बनावट प्रमाणपत्र सादर करून सोईच्या ठिकाणी बदली करून घेणाºया शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी चौकशी समितीची आवश्यकता उपस्थित सदस्यांनी मांडली. या समितीद्वारे संबंधीत शिक्षकांच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याबाबत ठराव आज सर्वानुमते मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेच्या इमारतींचे निर्लेखन करण्याचा विषयही सभेत चर्चेत आला. याबाबत लवकरच कायवाही होणार असल्याचे शिक्षण समितीचे अध्यक्ष सहारे यांनी सदस्यांना सांगितले.
यावेळी जि.प. शिक्षण समिती सदस्य गोपाल दडमल, मेघा नलगे, कल्पना पेचे, जे.डी. पोटे, नितू चौधरी, रंजीता सोयाम व शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर तसेच सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
दोन विषयांच्या अध्ययन चाचणीचा अहवाल सभेत सादर
जि.प. प्राथमिक शाळांमधील एक ते आठ पर्यंतच्या मराठी आणि गणित विषयांच्या अध्यायन चाचणीचा आढावा डायट मार्फतीने काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. या अहवालानुसार अनेक शाळांच्या चुका पुढे आल्या आहेत़ शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीसंदर्भात डायटने उपाययोजना सुचविल्या आहेत. हा अहवाल डायटचे प्राचार्य धनंजय चाफले यांनी शिक्षण समितीच्या सभेत आज सादर केला. उपाययोजनांची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचे सभेत सांगण्यात आले़
‘त्या’ मुख्याध्यापकाचे वेतन थांबविले
पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी (देशपांडे ) व देवई जि.प. शाळेमध्ये शालेय पोषण आहार मिळत नसल्याचा प्रश्न समिती सदस्य योगीता डबले यांनी सभेत मांडला. याशिवाय पिपरी शाळेचे मुख्याध्यापक अनधिकृत गैरहजर राहत असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान त्या मुख्याध्यापकाचे जून महिन्याचे वेतन थांबविण्यात आले़ शालेय पोषण आहार मिळत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी दिली.
क्रीडा संमेलनाच्या अनुदानात वाढ
जि.प. शाळाअंतर्गत बिटस्तरीय क्रीडा संमेलनासाठी यापूर्वी १५ हजार रुपयांचा निधी दिला जात होता. मात्र या निधीत क्रीडाविषयक गरजा भागत नसल्याने या वर्षापासून तीन हजार रुपयांची वाढ करून १८ हजार रुपये देण्याचा निर्णय जि़ प़ शिक्षण समितीने घेतला आहे़
‘त्या’ शाळांना बजावणार नोटीस
जि. प. शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागील महिण्यात प्राथमिक शाळांना भेटी देऊन तपासणी केली होती. त्या तपासणीदरम्यान संबंधीत शाळांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला़
शिक्षण परिषद सुरू होणार
शिक्षण समितीच्या सभेमध्ये तालुकास्तरीय शिक्षक परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दर्जेदार शिक्षणासाठी या परिषदेची गरज सदस्यांनी अधोरेखित केली. जि.प. शाळेतील विद्यार्थी स्पर्धेसाठी सक्षम व्हावीत, या हेतूने सदर प्रस्तावाला सदस्यांनी मान्यता दिली आहे़

जि.प. शाळांची गुणवत्ता सुधारावी यासाठी सभेमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शिक्षण बदली प्रकरणात दोषी आढळलेल्या शिक्षकांवर कारवाई होईल. आज पारित केलेल्या ठरावाची प्रभावीणपणे अंबलजावणी होणार आहे.
- कृष्णा सहारे,
उपाध्यक्ष जि.प. तथा अध्यक्ष शिक्षण समिती.

Web Title: The committee will inquire into the fake certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.