मराठा-कुणबी मूक मोर्चासाठी समित्या स्थापन
By admin | Published: September 29, 2016 12:51 AM2016-09-29T00:51:23+5:302016-09-29T00:51:23+5:30
राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाचे लोन चंद्रपुरात पोहोचले आहे.
चंद्रपुरात पार पडली द्वितीय बैठक : तालुकास्तरावर होणार बैठकांचे आयोजन
चंद्रपूर : राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाचे लोन चंद्रपुरात पोहोचले आहे. चंद्रपुरातही १९ आॅक्टोबरला मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या आयोजनाबाबत द्वितीय बैठक चंद्रपुरातील मातोश्री विद्यालयात पार पडली. या बैठकीत अर्थसमिती, समन्वय समिती, प्रचार-प्रसार समिती, वार रुम, प्रचार कार्यालयाबद्दल समित्या स्थापना करण्यात आल्या.
तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करुन तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीची तारीखही यावेळी निश्चित करण्यात आली. या बैठकीला मराठा-कुणबी समाजातील अनेकांनी उत्साहात सहभाग घेतला होता. बैठकीमध्ये १९ आॅक्टोबरला होणाऱ्या मोर्चाचे नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. त्यामध्ये २९ सप्टेंबरला सकाळी १० वाजता राजुरा, दुपारी १२ वाजता जिवती, दुपारी ३ वाजता गडचांदूर, ३० ला सकाळी १० वाजता गोंडपिंपरी, दुपारी १२ वाजता पोंभूर्णा, सायंकाळी ५ वाजता मूल, सायंकाळी ७ वाजता सिंदेवाही तर १ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता नागभीड, दुपारी १२ वाजता ब्रह्मपुरी, दुपारी ३ वाजता चिमूर, सायंकाळी ७ वाजता सिंदेवाही व २ आॅक्टोबरला दुपारी १२ वाजता भद्रावती, दुपारी ४ वाजता वरोरा येथे बैठकांचे आयोजन करण्याचे ठरले.
या मोर्चामध्ये १० लाख नागरिक सहभागी होण्याची शक्यता मान्यवरांनी यावेळी दर्शविली. या मोर्चासाठी मराठा-कुणबी समाजातील सर्व बांधवांनी सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहन मराठा- कुणबी क्रांती मूक मोर्चाच्या सदस्यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)