तुकूम शिवारात भरदिवसा पट्टेदार वाघाचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:48 AM2019-04-05T00:48:17+5:302019-04-05T00:54:51+5:30
चिमूर तालुक्यातील तुकुम येथे अनेक दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. अशातच गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान तुकुम येथील तलावात कपडे धुणाऱ्या महिलांना झुडपात पट्टेदार वाघ दिसला. लगेच याची गावकऱ्यांना माहिती देण्यात आली आणि पट्टेदार वाघाला पाहण्याकरीता एकच गर्दी उसळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ बु : चिमूर तालुक्यातील तुकुम येथे अनेक दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. अशातच गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान तुकुम येथील तलावात कपडे धुणाऱ्या महिलांना झुडपात पट्टेदार वाघ दिसला. लगेच याची गावकऱ्यांना माहिती देण्यात आली आणि पट्टेदार वाघाला पाहण्याकरीता एकच गर्दी उसळली. माहिती देऊनही वनविभागाचे कर्मचारी दोन तास विलंबाने आले. त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
तुकूम परिसरात अनेक दिवसांपासून पट्टेदार वाघ आढळून येत आहे. सोमवारी दयाराम गजभिये यांच्या शेतामध्ये अशोक विठोबा खिरडकर यांच्या गायीला पटेदार वाघाने ठार केले. यापूर्वीही दिलीप सुर यांची गाय ठार केली.
दोन महिन्यांपासून परिसरात पट्टेदार वाघ वास्तव्य करीत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण दिसून येत आहे.
ताडोबाच्या कोलारा प्रवेशद्वारापासून जवळच तुकूम तलाव परिसरात पट्टेदार वाघ दिसल्याने लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तलावावर कपडे धुणाºया महिलांना व ईश्वर शेडामे यांना हा वाघ दिसल्यानंतर त्यांनी गावकºयांना माहिती दिली.
गावकऱ्यांनी आता वाघाला बघण्यासाठी गर्दी केली असून, वनविभाग व पोलीस विभाग या वाघावर लक्ष ठेवून आहे.
वाघाचा बंदोबस्त करा
तुकुम परिसरात अनेक दिवसांपासून पटेदार वाघ वास्तव्य करीत असून अनेकांच्या शेतामध्ये गायीची वाघ शिकार करीत आहे. ताडोबा कोलारा गेटचा रहदारीच्या मुख्य मार्गावर अनेकाना वाघ दिसत आहे. त्यामुळे परिसरात शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, महिलांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येते. वन विभागाने वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.