शेतकऱ्याच्या संपादित जमिनीचा मोबदला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:41 AM2021-02-26T04:41:08+5:302021-02-26T04:41:08+5:30
पिंपळगाव(भो): ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव भो. परिसरातील शिवारातून गोसेखुर्द कालव्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्या. सुरबोडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ...
पिंपळगाव(भो): ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव भो. परिसरातील शिवारातून गोसेखुर्द कालव्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्या. सुरबोडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कालव्याचे काम करताना सबंधित विभागाने आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या जमिनीतून कालव्याचे खोदकाम केले. यासोबतच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कॅनलचे काम बळजबरीने करून शेतकऱ्यांवर अन्याय केला. ज्या शेतकऱ्याच्या जमिनीतून कालव्याचे काम केले, त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावानुसार मोबदला मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनराज मुंगले यांनी केली.
असे न झाल्यास याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. गेल्या १३ वर्षापासून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदन देऊन उंबरठे झिजविले. मात्र आजतागायत शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही.
सुरबोडी येथील ताराचंद बावनकुळे, नारायण कामडी, संजय कामडी, राजू कामडी, धर्माजी बगमारे, गंगाधर बगमारे, हरिश्चंद्र बावनकुळे, केवळ ठेंगरी या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना नवीन भू-संपादन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे नवीन दराने मोबदला एक महिन्याच्या आत देण्यात यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या बाजूने सदैव उभे राहून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा मुंगले यांनी दिला आहे.