क्षतिग्रस्तांना सोमवारपर्यंत नुकसान भरपाई द्या-सुधीर मुनगंटीवार
By admin | Published: July 11, 2016 12:45 AM2016-07-11T00:45:29+5:302016-07-11T00:45:29+5:30
सलग दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा शहरात तसेच मूल शहर
सलग दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा शहरात तसेच मूल शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात काही घरांची पडझड होवून नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची तातडीने दखल घेतली आहे. संबंधित तहसिलदारांना घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे व सोमवारपर्यंत तातडीने नुकसान भरपाईचे धनादेश नुकसानग्रस्त नागरिकांना सुपुर्द करण्याचेही आदेश दिले आहेत. संततधार पावसामुळे जिल्हयात नागरिकांची घरे पडून नुकसान झाले असल्यास संबंधित तहसिलदारांनी तातडीने दखल घ्यावी. नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, असे निर्देशही ना. मुनगंटीवार यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही काही सूचना केल्या आहेत. ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले, अशा नागरिकांना तातडीने भेटून त्यांची विचारपूस करीत त्यांना सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिले आहे.