जिल्ह्यातील ४५ शाळांवर संक्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:36 PM2017-12-05T23:36:32+5:302017-12-05T23:37:03+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत सुरू असलेल्या ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी आहे, अशा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
परिमल डोहणे।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्हा परिषदेंतर्गत सुरू असलेल्या ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी आहे, अशा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ४५ जि.प.शाळा बंद होणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र कॉन्व्हेंटच्या वाढत्या संस्कृतीमुळे जि.प.च्या प्राथमिक शाळेतील पटसंख्या कमी होत असून कॉन्व्हेंटच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दुसरीकडे जि.प. शाळेत कुठे एक तर कुठे दोन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येबाबत अहवाल मागितला होता. यावेळी दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर गुणवत्तेअभावी शाळेची पटसंख्या कमी आहे, असा ठपका ठेवत शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठविले आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेने या संदर्भात आता कार्यवाही सुरु केली आहे.
शिक्षकांचे समायोजन होणार
कमी पटसंख्या असलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे समायोजन एक किलोमीटरच्या आतील शाळेत करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने कार्यवाही सुरु केली असून विद्यार्थी व शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार
समायोजन करुन विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र सन २०१६-२०१७ चे शैक्षणिक सत्र अर्धे संपले आहे. आता शाळेत बदल होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणात बदल होणार असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केली जात आहे.