शासकीय कार्यालयांतून तक्रारपेट्या गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:25+5:302021-02-08T04:24:25+5:30
चंद्रपूर : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी असतात. आपल्या तक्रारी वरिष्ठांसमक्ष जाणार या हेतूने संबंधित विभागाच्या ...
चंद्रपूर : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी असतात. आपल्या तक्रारी वरिष्ठांसमक्ष जाणार या हेतूने संबंधित विभागाच्या प्रशासनाच्या दिशानिर्देशाने बहुतांश शासकीय कार्यालयांत तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र, आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. संबंधितांची तक्रार करावी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे.
शहरी भागातील अतिमहत्त्वाची कार्यालये तसेच ग्रामीण भागातील विविध विभागाच्या कार्यालयात शेकडो नागरिक आपल्या विविध कामानिमित्त ये-जा करतात. संबंधित कामात येणाऱ्या अडचणीमुळे अनेक प्रकारच्या तक्रारींचा निर्वाळा कालावधीत होत नाही. शासनाकडून अंमलबजावणी योग्यरित्या होत नाही. त्याचा त्रास सामान्य जनतेला होत आहे. कोणतीही तक्रार देण्याची इच्छा असतानाही कार्यालयात तक्रार पेट्याच नसल्याने तक्रार करावी तर कुठे अशा प्रश्न निर्माण होत आहे.
नागरिकांना एकाच कामासाठी अनेकदा चकरा माराव्या लागतात. नागरिकांचे प्रश्न अविलंब सुटावे, तक्रार झाली तर कामकाजात सुधारणा व्हावी याकरिता प्रत्येक कार्यालयात तक्रार पेट्या लावणे काळाची गरज आहे. काही वर्षांपूर्वी शासनाने प्रत्येक शासकीय-निमशासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लावण्याविषयी निर्णय घेतला होता. परंतु, आज बहुतांश सरकारी कार्यालयांतून तक्रारपेट्याच गायब झाल्याचे दिसून येत आहे.
काही कार्यालयांमध्ये तक्रारी थेट आवक विभागात स्वीकारल्या जातात. परंतु, सर्वसाधारण नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता तक्रारपेट्या असणे ही काळाची गरज आहे.