उपसभापतीकडून शासकीय वाहनाचा गैरवापर केल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:01 AM2017-10-29T00:01:09+5:302017-10-29T00:01:24+5:30
जिवती पंचायत समितीच्या उपसभापतींकडून शासकीय वाहनाचा गैरवापर केला जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी सोमू सिडाम यांनी केली आहे.
चंद्रपूर : जिवती पंचायत समितीच्या उपसभापतींकडून शासकीय वाहनाचा गैरवापर केला जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी सोमू सिडाम यांनी केली आहे.
जिवती पंचायत समितीच्या सभापती,उपसभापतींना परिसरातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी भेट देऊन तेथील व्यवस्था पाहण्यासाठी शासकीय वाहन देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात सभापतींसाठी असलेले हे वाहन उपसभापती महेश देवकते यांच्याकडेच असते. आतापर्यंत एम. एच. ३४- ८६३६ या शासकीय वाहनावर वाहनचालकसुध्दा नियुक्त करण्यात आलेला नाही. मागील ९ महिन्यांपासून वाहनाचा गैरवापर सुरू आहे. शासकीय कामासाठी असलेले हे वाहन उपसभापती वैयक्तिक कामासाठीच वापरतात.
स्वत:च्या शेतावर मजुरांची ने-आण करणे, आंध्रप्रदेश, तेलंगणा क्षेत्रात फिरणे असा वाहनाचा गैरवापर सुरू आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करून उपसभापती देवकते यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सोमू जगू सिडाम रा. शेडवाही यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.