पालकांची खासदारांकडे तक्रार
By admin | Published: July 21, 2014 11:46 PM2014-07-21T23:46:13+5:302014-07-21T23:46:13+5:30
स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व विद्यालयात शिक्षकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक यांच्यात समन्वय नसल्याने दिवसेंदिवस येथे समस्या वाढत आहे. याकडे व्यवस्थापन मंडळाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.
हरिश्चंद्र पाल - तळोधी(बा.)
स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व विद्यालयात शिक्षकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक यांच्यात समन्वय नसल्याने दिवसेंदिवस येथे समस्या वाढत आहे. याकडे व्यवस्थापन मंडळाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. परिणामी पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात आता पालकांनी कठोर भूमिका घेतली असून खासदार, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शालेय प्रशासनाच्या विरोधात चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्याकडे तक्रार केली. सोबतच या निवेदनाच्या प्रती निदेशक, जन शिकायत, नवोदय विद्यालय समिती दिल्ली, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी (माध्य.) चंद्रपूर, प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा.) यांना पाठविल्या आहे. विशेष म्हणजे या निवेदनामध्ये साठ ते सत्तर पालकांच्या स्वाक्षरी आहे.
पालकांनी दिलेल्या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकासावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे.
विद्यालयातील मेस, गणवेष व इतर अनुदानात वाढ होवूनही विद्यार्थ्यांना सकस व समतोल आहार दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी अर्धेपोटी असतात. मागील एका वर्षापासून फळ देणे बंद केले आहे. भोजनगृहात जेवणापूर्वी हात धुण्याकरिता साबण किंवा वॉशींग पावडरची व्यवस्था नाही. पिण्याचे पाण्याचे आरोक्युरिफायर संयत्र पूर्णत: बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे दात, केस व डोळे तसेच आतळ्याचे आजाराचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थी निवास परिसरात नियमित पाणी पुरवठा होत नाही. निवास परिसरातील प्रसाधनगृहात पाण्याचा पुरेसा वापर होत नसल्याने दुर्गंधी आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
वर्ग ९ ते १२ या माध्यमिक वर्गात भौतिकशास्त्र व गणित विषयाचे अध्यापन व्यवस्थीत होत नसून अभ्यासक्रम पूर्ण केला जात नाही. परिणामी दरवर्षी बरेच विद्यार्थी जळगाव, नागपूर, नाशिक व चंद्रपूर येथे खासगी शिकवणीकडे धाव घेतात. मागील वर्षेभरात पीटीसीचीची बैठक झाली नाही. नवोदय विद्यालय परिसरातील साफसफाई विद्यार्थ्यांकडून करुन घेतली जात आहे. मुल्यशिक्षणावर भर दिला जात नसल्याने विद्यालयात मोबाईलच गैरवापर रॅगिंग व चोरी या सारखे वाईट कृत्य विद्यार्थ्यांकडून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यालयातील काही कर्मचारी, शिक्षक व प्राचार्य पालकांसोबत अरेरावीची भाषा करतात. विद्यार्थ्यांकडून समस्यांबाबत आवाज केल्यास त्यांना धमकावून मानसिक व शारीरिक छळ करुन शाळेतून काढण्याची धमकी ते असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.