वा रे वा! नियम तोडला एकाने, दंड दुसऱ्यालाच! वाहतूक शाखेकडे तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 04:35 PM2022-02-15T16:35:37+5:302022-02-15T16:45:46+5:30
चंद्रपूर वाहतूक पोलिसांकडे महिन्यात किमान पाच तक्रारी येत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ऑनलाईन युगात वाहतूक विभागही ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडाची पावती ऑनलाईन दिली जात आहे. मात्र दुचाकी किंवा चारचाकी विकल्यानंतर तशी नोंद न केल्याने वाहतूक नियम तोडणारे वेगळे आणि दंडाची पावती दुसऱ्यालाच असा प्रकार घडत आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाकडे तक्रारी वाढत आहेत.
तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच विभाग संगणीकृत झाले असून ऑनलाईन व्यवहार सुरू झाले आहेत. वाहतूक विभागही यामध्ये मागे नाही. परिणामी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चालानच्या स्वरूपात दंड आकारला जात आहे. मात्र, अनपेड चालानची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बहुसंख्य प्रकरणात जुन्याच दुचाकीमालकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ई-चालान जात असल्याने जुना वाहनधारक त्या संदेशाला गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे नियम तोडणार भलताच अन् दंड भलत्यालाच असा प्रकार नेहमीच बघायला मिळत आहे. ऑनलाईन कारवाईदरम्यान ज्यांच्या नावाने वाहन असेल त्यांच्या मोबाईलवर दंडाचा मॅसेज जात असल्याने असे प्रकार घडत असल्याची माहिती आहे.
वाहन विक्री केल्यानंतर ट्रान्सफर न करणाऱ्यांचे काय?
जुने वाहन विक्री केल्यानंतर संबंधित वाहनधारक ते वाहन दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करीत नसल्यास आणि वाहन नियम मोडल्यास त्यावर दंड आकारले जाते. त्या व्यतिरिक्त कागदपत्रे नसलीत तर वाहन जप्तही केले जाते.
९६ हजार जणांवर करोडाेचा ऑनलाईन दंड
वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ या दहा महिन्याच्या कालावधीत ९६ हजार ५५१ जणांवर कारवाई करीत २ कोटी ६६ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा ऑनलाईन दंड आकारला आहे.
महिन्याला किमान पाच तक्रारी
वाहन विक्री केले तरी माझ्या नावावर चालान आले, अशा प्रकारच्या तक्रारी वाढत आहेत.
चंद्रपूर वाहतूक पोलिसांकडे महिन्यात किमान पाच तक्रारी येत असतात.
ऑनलाईन दंडाचे दीड कोटी कसे वसूल करणार?
जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान पोलिसांनी ९६,५५१ जणांवर कारवाई करीत ई-चालान दिले. त्यापैकी ३९,२०४ जणांनी ९,१८,७०० रुपयांचा चालान भरला तर १ कोटी ७५ लाख ७०० रुपयांचा दंड थकीत आहे.
एखादे दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी करताना आरटीओ कार्यालय किंवा वाहतूक कार्यालयात जाऊन आपल्या वाहनावर दंड आहे का, याची खातरजमा करून घ्यावी. तसेच नोंदणीकृत मोबाइल नंबर बदलवून घ्यावा.
प्रवीणकुमार पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर