सिमेंट रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:16+5:302021-05-30T04:23:16+5:30

नागभीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु, कोरोनामुळे काही कामे बंद आहेत. तर ...

Complete the cement road works immediately | सिमेंट रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा

सिमेंट रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा

googlenewsNext

नागभीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु, कोरोनामुळे काही कामे बंद आहेत. तर काही कामे कासवगतीने सुरू आहेत. आता रहदारी कमी असल्याने कामाला गती द्यावी, अशी मागणी आहे.

व्यावसायिकांद्वारे ग्राहकांची लूट

चंद्रपूर : ग्राहकांना वस्तू मोजून देणे व वजनानुसार बरोबर पैसे घेणे, ही व्यवहाराची पद्धत आहे, पण पैसे बरोबर देऊनही वजनात तूट निर्माण होण्याच्या प्रकारामुळे ग्राहक लुटले जात आहेत. लहान-मोठ्या विक्रेत्याकडून सर्रासपणे अशी लूट सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी आहे.

अंगणवाडी केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव

ब्रह्मपुरी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्राची दुरवस्था झाली आहे. बालकांच्या पूर्व शालेय शिक्षणाची उपेक्षा होत आहे. आता कोरोनामुळे अंगणवाडी बंद असल्याने या अंगणवाडीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक अंगणवाडी केंद्रात मुलांना खेळण्यासाठी साहित्य नसल्याची माहिती आहे.

दरवाढीने शेतकरी त्रस्त

सावली : यंदा अल्प उत्पादन झाल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच नुकत्याच खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली. त्यामुळे नव्या हंगामासाठी पैशाची तडजोड कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. खताच्या किमती कमी कराव्या, अशी मागणी आहे.

अनावश्यक सेवांनी मोबाईलधारक त्रस्त

चंद्रपूर : मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला आहे, पण कंपन्याकडून अनावश्यक सेवांचा भडिमार ग्राहकांवर होत आहे. यामुळे मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे केली जाते, पण त्याचा निपटारा होत नसल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहकवर्ग त्रस्त झाले आहे.

मैदानी खेळाबाबत जनजागृती गरजेची

चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र, सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. मोबाइल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाईलवरच विविध खेळ खेळताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यावरील पार्किंगमुळे नागरिक हैराण

मूल : गांधी चौक परिसरात रस्त्यावर वाहने पार्किंगसाठी ठेवली जातात. काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली होती़ पण कोरोनापासून कारवाई थंडावली़ या मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास होत आहे. यापूर्वी अनेकदा रस्त्यावरील पार्किंग हटविण्याची मागणी केली होती.

प्रवासी निवारा बांधण्याची मागणी

चिमूर : शंकरपूर, ब्रह्मपुरी, कान्पा येथे जाण्यासाठी फाट्यावर यावे लागते. या फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने या परिसरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना रस्त्यात राहून बसची वाट बघावी लागते. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी निवाऱ्याची मागणी होत आहे.

रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

कोरपना : तालुक्यातील अनेक गावांची व गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची कित्येक वर्षे लोटूनही अवस्था जैसे थे आहे. या रस्त्याचे भाग्य उजळणार कधी, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे. आवारपूर, लोणी आदी गावाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी

ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे.

हातपंप दुरुस्तीकडे लक्ष द्यावे

नागभीड : तालुक्यातील अनेक गावांचे हातपंप नादुरुस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून, विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे बंद हातपंप दुरुस्तीसाठी पथक पाठविणे अत्यावश्यक झाले आहे.

बाजारपेठेत स्वच्छतागृहाची मागणी

राजुरा : राजुरा शहरातील भाजी मार्केटमध्ये मुत्रीघर आहे. परंतु या ठिकाणी मोठी गर्दी असते. त्यामुळे उईके चौक येथील बाजारपेठेजवळ स्वच्छतागृह बनविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नगर परिषद, राजुरा यांच्याकडे मागणी केली आहे.

भारोसा घाटावर पुलाची निर्मिती करा

नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील भारोसा घाटावरून तीर्थक्षेत्र वढा व जुगादला जाण्यासाठी पुलांची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. या ठिकाणी पुलाची निर्मिती झाल्यास जाण्यायेण्यासाठी सोयीचे होईल.

Web Title: Complete the cement road works immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.