जिल्ह्यात ३६० शेततळ्यांचे काम पूर्ण
By admin | Published: September 16, 2016 01:40 AM2016-09-16T01:40:59+5:302016-09-16T01:40:59+5:30
शेतकऱ्यांना सहज सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम
चंद्रपूर : शेतकऱ्यांना सहज सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून सुरु केला आहे. शाश्वत आणि हक्काची सिंचन सुविधा देणाऱ्या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी १९६३ शेतकऱ्यांना शेततळे उपलब्ध करुन दिले जाणार असून आतापर्यंत ३६० शेततळे पूर्ण झाले आहेत.
सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून राहावे लागते. खरीपाच्या मुख्य हंगामातही पावसाने दगा दिल्यास ही पिकेही हातचे जातात. हक्काची सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास खरीपासह अन्य पिकेही शेतकऱ्यांना घेता येवू शकतो. तसेच रब्बी व उन्हाळी पिकेही घेतली जावू शकते. यासाठी सिंचन असणे फार आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अनेक पिके घेण्यास प्रोत्साहित करण्यासोबतच या माध्यमातून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना १७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली आहे.
जिल्ह्याला सन २०१६-१७ या योजनेच्या प्रथम वर्षाकरिता १९६३ इतक्या शेततळयांचे लक्षांक देण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज करावयाचे होते. जिल्ह्यातील ३१२७ शेतकऱ्यांनी शेततळयांसाठी अर्ज सादर केले आहे. अर्जाच्या छाननीनंतर २२१४ तांत्रिक दृष्टया तसेच जागा योग्य असल्याचे आढळून आले. तालुका समितीने लक्षांकानुसार २००३ अर्जांना मंजूरी दिली आहे.
शेततळ्यांसाठी शासनाच्या वतीने कमाल ५० हजारापर्यंत अनुदान मंजूर केल्या जाते. समितीने मंजूर केलेल्या अर्जांपैकी १७१६ अर्जदार शेतकऱ्यांना शेततळे खोदण्याच्या कामास कायार्रंभ आदेश दिले असून ३६० शेततळे खोदून पूर्ण झाली आहे. जिल्ह्याला दिलेल्या लक्षांकापैकी सर्व शेततळे याचवर्षी पूर्ण होणार आहेत. शेततळे पूर्ण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची यापूर्वी सुविधा नव्हती, अशा शेतकऱ्यांना सहज शेततळे संजिवनी देणारे ठरणार आहे.
शिवाय एकापेक्षा जास्त पिके शेतकरी शेततळयातील पाण्याच्या भरवशावर घेणार असल्याने त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासोबतच जिवनमान उंचावण्यासही मोलाचे ठरणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)