निकषाची पूर्तता : एक वर्षांपासून विकास कामे ठप्प
By admin | Published: July 14, 2014 01:54 AM2014-07-14T01:54:29+5:302014-07-14T01:54:29+5:30
ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, सचिव व नागरिकांनी सहकार्य करीत
शेकडो ग्रामपंचायतींचा पर्यावरण समृद्ध योजनेचा निधी रखडला
वरोरा : ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, सचिव व नागरिकांनी सहकार्य करीत आपले गाव पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेमध्ये आणले. या योजनेत चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्या. मात्र या ग्रामपंचायतींंना मागील एक वर्षांपासून अनुदानाचे वाटपच करण्यात आले नाही. त्यामुळे पर्यावरण संबंधिची बहुतांश कामे निधीअभावी ठप्प झाली आहेत.
पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी गावातील लोकसंखेच्या प्रमाणात झाडे लावणे, गाव हागणदारी मुक्त करणे, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली ६० टक्के पूर्ण करणे, प्लास्टिक बंंदी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होणे, यशवंत पंचायत राज अभियानात सहभाग होणे, हे निकष आहेत. या निकषामध्ये ज्या ग्रामपंचायती उतरल्या त्यांचा पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेमध्ये निवड करण्यात येते. त्यानंतर सलग तीन वर्षे लोकसंख्येवर आधारीत अनुदान ग्रामविकास विभागाकडून मिळते.
या अनुदानातून नवीन झाडांची लागवड, ७५ टक्के हागणदारी मुक्तीसाठी प्रोत्साहन देणे, गावात सौर ऊर्जेचे पथदिवे लावणे, घनकचरा व्यवस्थापन, सांंडपाणी व्यवस्थापन यावर या अनुदानातून खर्च करण्यात येतो.
त्यानंतर याच प्रकारची कचऱ्यापासून खत निर्मिती, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात ६० टक्के सहभाग अपारंपारीक ऊर्जा, आदी कामे तिसऱ्या वर्षीच्या अनुदानापासून करण्यात येते. सन २०१२-१३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींनी पंचायत समितीच्यामार्फत प्रस्ताव पाठविले. याला एक वर्षांचा कालावधी लोटला. परंतु अद्यापही ग्रामपंचायतच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही. शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेतील कामे कशी करावी, असा प्रश्न ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सचिवांना पडला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण करूनही अनुदानाअभावी योजना राबविता येत नसल्याने त्यांच्यापुढे मोठी समस्या उभी झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)