मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी परिसर स्वच्छता महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:32 PM2017-12-04T23:32:48+5:302017-12-04T23:55:05+5:30
नागरिकांनी घरोघरी शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे.
आॅनलाईन लोकमत
मूल : नागरिकांनी घरोघरी शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. जंगलाला लागून असलेल्या गावात घरोघरी झाडेझुडपी असल्यामुळेच वन्यजीव आणि मानवांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. नागरिकांनी परिसर स्वच्छतेला महत्त्व दिल्यास मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यास मदत मिळेल, असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांनी मांडले.
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी मूल आणि ब्रह्मपुरी येथील गावागावातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मानव-वन्यजीव संघर्षाबाबत प्रशासन आणि जनता यांच्यात संवाद कार्यक्रम मूल येथील कन्नमवार सभागृहात पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक नरवने, उपवनसंरक्षक सोनकुसरे, मध्य चांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी परदेशी, वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, पूनम धनवटे, नागभीडचे पोलीस निरीक्षक शेवाळे, सावलीचे पोलीस निरीक्षक धुळे, सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक इंगळे, ब्रह्मपूरची पोलीस निरीक्षक चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक बोरकुटे, लबडे आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी केले. संचालन पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी तर आभार पाथरीचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मानले.
यशस्वीतेसाठी सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गौरकार, संतोष रायपूरे, भगवान चौधरी, सुनील घोडमारे, रामटेके, सचिन सायकार, पोलीस मित्र सुरेश खोब्रागडे व पोलीस कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. यावेळी सरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील व गावागावातील प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणावर होत आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठी सहनशक्ती आहे. यामुळे जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा वावर आहे. जिल्ह्याला वरदान असून वन्यसृष्टी टिकली पाहिजे, यासाठी गावात इको डेव्हलपमेंट समिती कार्यरत असून जंगलाच्या संरक्षणासाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांच्या समन्वयाची गरज असून समन्वयन नसल्यास अशा गावात विनाकारण वाद उफाळून येतात. गावातील प्रश्न गावकºयांनी समन्वयातून सोडविण्याचे आवाहन उपवनसंरक्षक नरवने यांनी केले.