राज्य अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया

By admin | Published: March 19, 2016 12:44 AM2016-03-19T00:44:17+5:302016-03-19T00:44:17+5:30

राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला.

Composite response to the state budget | राज्य अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया

राज्य अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया

Next

चंद्रपूर : राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात चंद्रपूर शहर विकासासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात चंद्रपूर शहर विकासाठी १०० कोटींची तरतुद केली असल्याने चंद्रपूर शहरातील विविध समस्या मार्गी लागणार आहेत. तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी निधीची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त चंद्रपूर विमानतळाचा विकास तसेच रस्ते, आरोग्य, अंगणवाडी केंद्र, मालगुजारी तलाव, मुलींच्या वसतिगृहासाठी निधीची तरतूद केल्याने अनेक कामांना चालना मिळणार आहे. या अर्थसंकल्पावर जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, संमिश्र प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिल्या.


ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नवीन चंद्रपूरच्या विकासाकरिता १०० कोटींची तरतूद आहे. परंतु, जेथे दाट वस्ती आहे, तेथील वस्तीकरिता कोणत्याही निधीची तरतूद नाही. त्याचप्रमाणे बेरोजगार युवकांकरिता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही.
- किशोर जोरगेवार,
उपजिल्हा प्रमुख, शिवसेना.

सर्वसामान्यांना व ग्रामीण भागातील नागरिक तथा बळीराज्याला न्याय देणारा अर्थसंकल्प नाही. तसेच व्हॅट वाढवून जनतेला वेठीस धरणारा हा बजेट आहे. तरतूद अनेक योजनांसाठी केली. मात्र शासनाकडे पैसा नाही असा, हा अर्थसंकल्प आहे.
- डॉ. अविनाश वारजूकर,
माजी आमदार.

राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांच्या सन्मानाचे रक्षण करत विविध योजनांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीत महिलांचा सहभाग अधिक सक्षम करण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमीकरण अभियान राबविण्याचा निर्णय, महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना ० टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्व. सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना राबविण्याचा निर्णय, राज्य महामार्गावर स्वच्छतागृहे, तसेच अंगणवाडी सेविका व मदतनिसांना विमा संरक्षण, संजय गांधी निराधार योजना आदींचा समावेश असून हा अर्थसंंकल्प महिलांच्या हिताचा आहे.
- अंजली घोटेकर
नगरसेविका तथा जिल्हा महिला सरचिटणीस, भाजपा.

राज्याच्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेलच. मात्र शेती व शेतकरी सुद्धा स्वंयपुर्णतेकडे वाटचाल करतील. ना. मुनगंटीवार शेतकरी हिताचा अर्थसंकल्प दिला आहे.
- शेख जुम्मन रिझवी,
उपाध्यक्ष, भाजपा किसान सेल.

अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र शासन जुन्या योजना बंद करून नव्या योजना कार्यान्वित करीत आहे. जुन्या योजना चांगल्या रितीने चालविल्यास नागरिकांना त्याचा जास्त फायदा होईल.
- सतीश वारजूकर,
जि. प. गटनेते काँग्रेस.

राज्याचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना केंद्रबिंदू माणून सादर केल्याचा कांगावा सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांना कुठल्या योजना देणार, हे काहीच सांगितले नाही. केवळ पुतळे तयार करून शेतकऱ्यांना काय देणार?
- सुभाष धोटे,
माजी आमदार, राजुरा.

राज्याचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा भ्रमनिराश करणारा आहे. कोणताही ठोस निर्णय न घेता केवळ शेतकऱ्यांची बोळवण करून त्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न शासनाकडून दिसून येते.
- संदीप गड्डमवार,
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी २५ हजार कोटींची तरतुद करून व सिंचनावर भर देऊन शेतकऱ्यांकरिता अर्थमंत्र्यांनी सुखद घोषणा केली.
- प्रा. चंद्रकांत गंपावार, वरोरा.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आले आहे. परंतु, घोषणा करून चालणार नाही. त्याचा मागोवा घ्यावा लागेल. विदर्भात दुग्ध व्यवसायाला पाहिजे तेवढा निधी दिला नाही.
- नितीन मत्ते, जि. प. सदस्य.

अर्थसंकल्पात पांदण रस्ते, कृषी प्रक्रिया, उद्योग योजना, जलसाक्षरता आदींबाबत भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळेल.
- रिता उराडे,
नगराध्यक्ष, ब्रह्मपुरी.
सिंचन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. मालगुजारी तलाव, मत्स्यसंवर्धन यासाठी केलेली तरतुद व जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेसाठी केलेली तरतूद विकासाचे धोतक आहे.
- दामोधर मिसार,
संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक.

केवळ आश्वासनाची खैरात अर्थसंकल्पात आहे. शेतकऱ्यांचे हित साधायचे असेल तर संपूर्ण कर्जमाफी करायला हवी. अंगणवाडी सेविका विम्याचे संरक्षण देण्यापेक्षा त्यांना चर्तुथ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन वाढ करण्याची गरज होती.
- दिनेश गावंडे,
माजी उपसभापती, पं. स. नागभीड.

ना. मुनगंटीवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे हित साधणारे आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम अर्थसंकल्पातून झाली आहे.
- सचिन आकुलवार.

शेती, उद्योग, रोजगार निर्मीती, पायाभुत सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा आदी बाबींची दखल घेऊन, त्यांच्यासाठी विकासात्मक पावले उचलल्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प सर्वांना सामावून घेऊन विकासाकडे घेऊन जाणारा ठरणार आहे.
- हंसराज अहीर
केंद्रीय राज्यमंत्री.

अर्थसंकल्प शेतकरी हिताचे असून सामान्य माणसाच्या विकासासाठी अनेक योजनांचा अर्थसंकल्पात समावेश आहे.
- अ‍ॅड. संजय धोटे,
आमदार, राजुरा.

बळीराजा, वंचित घटक व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून चांदा ते बांदा पर्यंतच्या सर्वसामान्य जनेतेचे हित साधणारा अर्थसंकल्प आहे.
- कीर्तीकुमार भांगडिया,
आमदार चिमूर.

Web Title: Composite response to the state budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.