ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, भाजपला संमिश्र यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:34 PM2018-02-28T23:34:50+5:302018-02-28T23:36:01+5:30
जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर २३ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. बुधवारी सकाळी मतमोजणी करून निकाल घोषित झाले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर २३ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. बुधवारी सकाळी मतमोजणी करून निकाल घोषित झाले. यात वरोरा, जिवती तालुक्यात काँग्रेस, बल्लारपूर तालुक्यात भाजप तर राजुरा तालुक्यात शिवसेना समर्पित उमेदवारांनी विजय मिळविला.
चिमूर तालुक्यातील भिसी येथील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ईश्वर डूकरे यांनी ५१९ मते घेत सुरेश वंजारी यांचा पराभव केला. तर मूल तालुक्यातील चिरोली येथील एका जागेसाठी पुरूषोत्तम कोमलवार यांनी २२० मते घेत महेश शिंदे यांचा पराभव केला.
शेडवाही (लांबोरी) ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा
जिवती : तालुक्यातील शेडवाही (लांबोरी ) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदी कॉग्रेसच्या अनिता देवराव सिडाम यांचा विजय झाला. तर सदस्य म्हणून गौतमी सोमु सिडाम, येतमुबाई बिलाजी कुमरे,धोबी देवाजी सिडाम यांचा विजय झाला.
येथील आठ जागांवर सरपंचासह कॉग्रेसचे तीन सदस्य निवडून आले. तर बीआरएसपीच्या जंगुबाई मेश्राम व गजानन मसुरे यांना दोन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीच्या टक्कुबाई कोमले तर शेतकरी संघटनेचे शित्रु सिडाम विजयी झाले. सर्व सदस्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
ईश्वर चिठ्ठीने झाला विजय
गेवरा : सावली तालुक्यातील आकापूर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस समर्पित उमेदवार ईश्वर चिट्टीने विजयी झाले. येथे सुरेश देविदास डोंबळे व अंताराम आत्माराम चौधरी यांना सारखी शंभर मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिट्टी काढण्यात आली. यात सुरेश डोंबळे यांचा विजय झाला.
वरोरा तालुक्यात काँग्रेसचा दबदबा
वरोरा : तालुक्यातील अर्जुनी (तु) व सालोरी येथे सार्वत्रिक तर सोईट, भटाळा, जळका या तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपले उमेदवार निवडून आणत दबदबा कायम ठेवला आहे. सोईट ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या पुष्पा धंदरे यांनी भाजपच्या सपना देशमुख यांचा ११३ मतांनी पराभव केला. चार-चार सदस्य असलेल्या सोईट ग्रामपंचायतीवर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने या ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. विजयी उमेदवार पुष्पा धंदरे यांचे वरोरा काँग्रेस कार्यालयात डॉ. विजय देवतळे व डॉ. आसावरी देवतळे यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. तर अर्जुनी (तु) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदी काँग्रेसचा यामिनी बोथले विजयी झाल्या. येथे सदस्यपदासाठी काँग्रेसचे अंकुश मडावी, सुनील बोढे, विशाखा कुमरे, वामन ढोणे, माया ढोणे, संगीता गुरनुले विजयी झाले. भटाळा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या पुष्पा दाते विजयी झाल्या. तर जळका ग्रामपंचायतीमध्ये कॉग्रेसच्याच वंदना दोरखंडे विजयी झाल्या. सालोरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक गायकवाड सरपंचपदी विजयी झाले.
बल्लारपूर तालुक्यात भाजपचा झेंडा
बल्लारपूर : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमध्ये मंगळवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. बुधवारी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यात नांदगाव (पोडे), मानोरा व लावारी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळविला तर चार जागेवर अविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रमेश कुळसंगे यांनी दिली.नांदगाव (पोडे) ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक मधील एका जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपाचे प्रकाश विधाते यांनी श्रावण निखाडे यांचा २२२ मतांच्या फरकाने पराभव केला. मानोरा ग्रामपंचायतमध्ये भाजपचे विजय ढोंगे यांनी काँग्रेसचे बंडू दुधबळे यांच्यावर ६५ मतानी तर लावारी ग्रामपंचायत मधील प्रभाग दोन मध्ये भाजपच्या विद्या मडावी यांनी २०७ मते घेत काँग्रेसच्या सविता मोरे यांचा ११६ मतांनी पराभव केला. अविरोध निवडून आलेल्या उमेदवारात नांदगाव (पोडे) येथील चंदा सिडाम, कळमना येथील सुजाता गावंडे, काटवणी (बामणी) येथे ज्योती गिरीधर आत्राम तर पळसगाव येथे शेख हसीना बसीर यांची अविरोध निवड झाली.
सास्ती ग्रामपंचायत शिवसेनेच्याच ताब्यात
सास्ती : राजुरा तालुक्यातील सास्ती ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा सेनेचीच वर्णी लागली आहे. सरपंचपदी शिवसेनेचे रमेश पेटकर यांनी बाजी मारली तर सदस्य पदाकरिता सेनेच्या ६ उमेदवारांनी विजय मिळविला. येथे भाजपला ३ तर काँग्रेसला २ जागांवरच समाधान मानावे लागले. सास्ती ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात होते. विजयी उमेदवारात नरसिंग मादर, कुणाल कुडे, संगिता चन्ने, मंगेश लांडे, माया भटारकर, सुशिला आत्राम, कृष्णावतार संभोज, नंदा बेतुलवार, लक्ष्मी नल्ली, राजकुमार भोगा, बेबीनंदा चिंतला यांचा समावेश आहे. येथील सरपंच पदाकरिता ७ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सेनेचे रमेश पेटकर यांनी ७८६ मते घेत काँग्रेसचे बंडू चन्ने यांचा पराभव केला. तसेच तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळनाथ वडस्कर यांनी काँग्रेसच्या सुरेश इटनकर यांचा पराभव केला. गोवरी येथे भाजपाच्या दिगंबर देवाळकर यांनी अपक्ष उमेदवार हरिचंद्र जुनघरी यांचा पराभव केला. तर डोंगरगाव ग्रामपंचायतीमध्ये अनुसया पेंदार यांनी यशोदाबाी मडावी यांचा १३ मतांनी पराभव केला. पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये शुभांगी गोनेलवार यांनी उषा वाकुळकर यांचा १५० मतांनी पराभव केला.