५७३ प्रकरणात ३ कोटी ४० लाख रुपयांची ताडजोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:44 AM2020-12-15T04:44:04+5:302020-12-15T04:44:04+5:30
चंद्रपूर : राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जिल्ह्यातील ५७३ प्रकरणे आपसी तडजोडीने निकालात निघाली असून यामध्ये तीन कोटी ३९ लाख ९९ ...
चंद्रपूर : राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जिल्ह्यातील ५७३ प्रकरणे आपसी तडजोडीने निकालात निघाली असून यामध्ये तीन कोटी ३९ लाख ९९ हजार १०२ रुपये मुल्याच्या वादांबाबत तडजोड झाली आहे.
आपसी तडजोडीने वाद मिटविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात न्यायालयात येण्याअगोदरीची प्रकरणे, विविध बँका, विमा कंपनी, विद्युत वितरण कंपनी, बीएसएनएल कंपनी, तसेच विविध पक्षकारांनी आपले वाद आपसी समझोत्याने निकाली काढण्यासाठी उत्स्फुर्तपणे भाग घेतला होता. लोक अदालतमध्ये न्यायालयीन प्रलंबित २२५ प्रकरणे आणि दखलपूर्व ३४८ असे एकूण ५७३ प्रकरणे निकाली काढण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्ष कविता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीधर मौदेकर व के. पी. श्रीखंडे, दिवाणी न्यायाधीश एम. ए. शिलार, एम.एस.काळे, कामगार न्यायालयाच्या न्या. एस.झेड. खान आणि प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. कुळकर्णी व एस. आर. जाधव यांनी पॅनल न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
बॉक्स
ग्रामपंचायतीला ५५ लाखांची थकीत करवसुली
राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्ह्यातील १२२ ग्रामपंचायतीमधील एक हजार ४४१ प्रकरणात रुपये २६.३१ लक्ष वसुली करण्यात आली असून एक हजार ९१ प्रकरणातील थकित करधारकांनी २९ लाख १७ हजार रुपये चार दिवसात ग्रामपंचायतीकडे जमा करण्याबाबत तडजोडनाम्यात लिहून दिले आहे. लोकन्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेअंतर्गत एकाचवेळी मोठया प्रमाणात थकित कराचा भरणा झाल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. यातून अनेक विकास कामास चालना मिळून ग्रामस्थांकरिता गावात मुलभूत सुविधा निर्माण होतील.