खासगी शिक्षकांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:54+5:302021-05-14T04:27:54+5:30
फांद्या छाटण्याची मागणी चंद्रपूर : शहरातील काही रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या आहेत. या फांद्यामुळे अपघात होण्याची शक्यता ...
फांद्या छाटण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील काही रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या आहेत. या फांद्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, गांधी चौक ते जटपुरा गेट तसेच तुकूम परिसरातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने झाडांच्या फांद्या रस्त्यावर आहेत. दरम्यान, नागपूर रोडवरील सीडीसीसी बँकेच्या परिसरातील फांद्या तोडण्यात आल्याने काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
घर दुरुस्तीच्या कामांना कोरोनाचे सावट
चंद्रपूर : पावसाळा अगदी एक महिन्यावर आला आहे. असे असतानाही कोरोनाच्या संकटामुळे अद्यापही ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये घर दुरुस्तीच्या कामांना वेग आला नाही. घर दुरुस्तीसाठी लागणारे साहित्यच मिळत नसल्याने नागरिकांचा नाईलाज झाला आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येणे अडचणीचे झाल्याने यावर्षी घर दुरुस्तीचे काम रखडणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायतीचे उत्पन्न घटले
चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे या बाजाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मिळणारे उत्पन्नही घटले आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन बाजार सुरू व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.
कोंडवाड्यांची दुुरुस्ती करावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोंडवाड्याची स्थिती दैयनीय झाली असून जनावरांच्या सुरक्षेचासुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत हद्दीतील कोंडवाड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
ऑटो चालकांना कीट देण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोनामुळे जिल्ह्यातील ऑटो चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. त्यामुळे या ऑटोचालकांना शासनाने धान्य कीट तसेच आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, शासनाने ऑटोचालकांना आर्थिक साहाय्य करण्याची घोषणा केली आहे. मात्र, अनेकांकडे स्वत:चे ऑटो नसल्याने त्यांना या मतदीपासून वंचित राहावे लागणार आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करावा
चंद्रपूर : शहरातील काही भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी कंत्राटदारामार्फत पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने कंत्राट काढून घेत महापालिकेने स्वत: पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नागरिकांना आजही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.
रखडलेले बांधकाम त्वरित करावे
चंद्रपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर जीवनावश्यक दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहत असून इतर सर्वच बंद आहे. पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. असे असले तरी ग्रामीण भागातील काही रखडलेले बांधकामे सुरूच झाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी
चंद्रपूर : पावसाळा अगदी महिनाभरावर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना योग्य बियाणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात ७० लाख रुपयांचे बोगस बियाणे पकडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे.
गावातील गर्दीवर आले नियंत्रण
चंद्रपूर : सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे गावाच्या पहारावर तसेच चौकाचौकांत नागरिकांच्या चर्चेवर प्रतिबंध आला आहे. त्यामुळे इतरवेळी सायंकाळी तसेच सकाळी चर्चा करण्यासाठी येणारे नागरिक आता आपल्या घरात राहणे पसंत करीत आहेत.