संविधान सन्मान रॅलीतून एकात्मतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:46 PM2018-11-26T22:46:14+5:302018-11-26T22:47:05+5:30
भारतीय संविधान दिनानिमित्ताने समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता मूल्यांचा समाजामध्ये प्रचार-प्रचार व्हावा या हेतूने समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वतीने सोमवारी चंद्रपुरात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय संविधान दिनानिमित्ताने समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता मूल्यांचा समाजामध्ये प्रचार-प्रचार व्हावा या हेतूने समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वतीने सोमवारी चंद्रपुरात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरूवात झाली. बौद्ध भिखु संघाच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी रॅली राष्ट्रध्वज दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, मुख्य संयोजक प्रवीण खोबरागडे आदी उपस्थित होते. भारतीय संविधानाने देशातील जनतेच्या विकासाचा मूलभूत दस्तावेज आहे. ब्रिटीश सत्तेविरूद्धच्या अथक संघर्ष केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. नव्या भारताची पूनर्रचना करण्यासाठी संविधानाने दिशा दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केले. संविधानातील जीवनमूल्यांची समाजात रूजवणूक व्हावी, याकरिता सोमवारी काढण्यात आलेल्या संविधान सन्मान रॅलीत समता सैनिक दलाचे पथ संचालन, संविधान रथ तसेच तिरंगा वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक आकर्षणाचा विषय ठरला. आदिवासी, बांगला व गरबा नृत्यासोबतच पंजाबी ढोल वाद्याने शहर दणाणले. भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या प्रबोधनात्मक देखाव्यांमुळे संविधान सम्मान रॅलीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत शहरातील विविध वॉर्डातील बौद्धविहार आणि आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते, शीख समाज, आदिवासी समाज, मुस्लीम, ओबीसी बहुजनातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. अॅड. सत्यविजय उराडे, अशोक निमगडे, नेताजी भरणे, विशाल अलोने, अशोक टेंभरे, डॉ. बंडू रामटेके, पप्पू देशमुख, स्नेहल रामटेके समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भीमगीतांद्वारे जनतेचे प्रबोधन
गांधी चौकातून निघालेली संविधान सन्मान रॅली जयंत टॉकीज चौक, जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चौकातून वळसा घेऊन जटपुरा गेट, कस्तूरबा रोड, गिरनार चौक मार्गाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचली. त्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत भीमगीतांनी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
संविधानामुळे सर्वांना समान अधिकार- अहीर
भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करताना ते बोलत होते. आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेविका सविता कांबळे, मनपा गटनेते वसंत देशमुख, नगरसेवक संदीप आवारी, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेविका वंदना तिखे, पुष्पा उराडे आदींची उपस्थिती होती. २६ नोव्हेंबर १९४९ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित घटनेच्या मसुदा समितीने भारतीय संविधान देशाला अर्पण केले. हा दिवस संपूर्ण देशभर संविधान दिवस म्हणुन साजरा केला जातो. त्या पवित्र दिवसाचे स्मरण करून आदरांजली वाहण्यास उपस्थित झाल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले. अन्य मान्यवरांनीही संविधान निर्मात्यांना अभिवादन केले.
भारतीय संविधानावर विचारमंथन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी पाच वाजता ‘भारतीय संविधान व लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर प्रबोधन सभा झाली. अध्यक्षस्थानी डॉ. विवेक बांबोळे तर प्रमुख वक्ते अॅड. फि रदोस मिर्झा, डॉ. दिलीप बारसागडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, चमकौरसिंग बसरा आदींनी विचार मांडले. विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. रात्री भारतीय संविधान व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला.