मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:28 AM2021-05-08T04:28:30+5:302021-05-08T04:28:30+5:30
चंद्रपूर : कोरोनापूर्वी उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात विविध नाटकाचे कार्यक्रम आयोजित केले जात होते. कालांतराने शंकरपटावर न्यायालयाने बंदी आणली. ...
चंद्रपूर : कोरोनापूर्वी उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात विविध नाटकाचे कार्यक्रम आयोजित केले जात होते. कालांतराने शंकरपटावर न्यायालयाने बंदी आणली. त्यामुळे दुय्यम तमाशे व नाटक कलाकारांवर संक्रांत आली. असे असले तरी झाडीपट्टीतील गावागावांत मंडईनिमित्ताने दुय्यम नाटकाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. यातून कलाकारांना काही प्रमाणात आर्थिक लाभ तर नागरिकांचे मनोरंजन होत होते. आता मात्र कोरोनाच्या सावटात लॉकडाऊन सुरू झाल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनही हिरावून नेले आहे.
झाडीपट्टीत विविध कलेत, विविध कलाकार पारंगत असल्याने गोंधळ तसेच नाटकांना नागरिक चांगला प्रतिसाद देत होते. विशेष म्हणजे, शेती कामातून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही प्रमाणात उसंत मिळत असल्याने नाटकाच्या मैफलीसाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून अनेक जिल्ह्यांतील कलाकार येत होते. विविध गावांत नाटक आयोजित केले जायचे.
ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही या तालुक्यांसह जिवती, गोंडपिपरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसादही मिळत होता. नागरिकांच्या मनोरंजनासाठी गावकऱ्यांकडून किंवा ग्रामपंचायत व समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत होते; परंतु गावातील शंकरपट बंदी आणल्याने बंद करण्यात आले. त्यानंतर कोरोना सावट सुरू झाल्याने मागील वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रमावरच नव्हे तर भजन, कीर्तन, गोंधळ यावरही बंदी आहे. यातून जनजागृती तसेच मनोरंजनही व्हायचे. आता सर्व व्यवसाय ठप्प असल्याने विविध कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून गावातील आर्थिक चक्रही बिघडले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या नाट्य कलावंत खडीगंमत कलावंत, गोंधळ कलावंत, कव्वाल कलावंत, कीर्तनकार व अन्य कलाकारांवर कोरोनाने मोठे संकट आले आहे.
बाॅक्स
घोडे व्यावसायिकांचेही नुकसान
चंद्रपूर : कोरोनामुळे सलत दुसऱ्याही वर्षी लग्नसराईचा खोळंबा झाल्याने घोडे व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे. मागील वर्षीपासून नववधूंना हातावर मेंहदी लावण्याऐवजी सॅनिटायझर लावण्याची वेळ आली आहे. सध्या तर केवळ २५ जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभाची परवानगी आहे. त्यामुळे ना घोडे, ना बँडबाजा अशी अवस्था लग्नघरी बघायला मिळत आहे. साध्या पद्धतीने लग्नविधी झटपट उरकून घेतले जात आहेत. यामुळे नवरदेवाची घोड्यावर बसून मिरवणुकीची हौस मावळली असून घोड्यासह व्यावसायिकांच्या पोटापाण्यालाही लगाम लागला आहे.
शहर तसेच गावातील यात्रा, उत्सव व लग्नसराईत मिरवणुकीसाठी लागणारा घोडा भाडोत्री देणारे व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे व जून आदी चार महिन्यांमध्ये त्यांची चांगली कमाई असते. यावरच ते वर्ष काढतात. मात्र, सद्य:स्थितीला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विवाह सोहळ्याला प्रशासनाने मर्यादा घातल्याने लग्नसराईचा खोळंबा झाला आहे. लग्न उरकते घेतले जात आहेत.
बाॅक्स
हौस कायम
काळानुरूप लग्न सोहळ्यात आधुनिकता आली असली तरी नवरदेवाची घोड्यावरून मिरवणूक काढण्याची हौस कायम आहे. शाही घोड्यासाठी तासभर मिरवणुकीचे १० ते २० हजार रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागते; परंतु सध्या कोरोनामुळे मिरवणुकीला बंधने आल्याने नवरदेवांची हौस पूर्णच होत नाही. यामुळे लग्नसराईत घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.