शिक्षक पदवीधारकांना सतावतेय भरतीची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:30+5:30
मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती रखडली होती. त्यानंतर मागील वर्षी २४ हजार पदांसाठी शिक्षक भरती घेण्यात आली. त्यातील शासकीय शाळेतील १२ हजार पदांवर भरतीप्रकीया पूर्ण झाली. परंतु, उर्वरीत खासगी शाळेतील मुलाखत भरती प्रकीया प्रलंबित होती. त्यातच कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. तेव्हापासून सदर भरतीप्रकीये संदर्भात कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसून येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षक भरतीबाबत अद्याप शासनाकडून कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नसल्याने डी.एड्, बीएड पदवीकाधारकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यातच कोरोनामुळे यावर्षी शाळा सुरू कधी होतील याबाबत अनिश्चितता असल्याने शिक्षक भरती होणार की, नाही अशी भीती डीएड्, बीएड् धारकांना सतावत आहे.
मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती रखडली होती. त्यानंतर मागील वर्षी २४ हजार पदांसाठी शिक्षक भरती घेण्यात आली. त्यातील शासकीय शाळेतील १२ हजार पदांवर भरतीप्रकीया पूर्ण झाली. परंतु, उर्वरीत खासगी शाळेतील मुलाखत भरती प्रकीया प्रलंबित होती. त्यातच कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. तेव्हापासून सदर भरतीप्रकीये संदर्भात कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसून येत नाही.
डी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास नोकरी मिळण्याची शास्वती असल्याने याकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जात असत. मात्र अतिरिक्त शिक्षकाचा दाखला देत शासनाने शिक्षक भरतीवर मर्यादा आणली. त्यातच टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याची अट घातली. अनेकांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर सुमारे सात वर्षानंतर भरतीप्रकीयेला सुरुवात करण्यात आली. परंतु, त्यातील केवळ अर्ध्याच जागा भरण्यात आल्या. त्यामुळे आता भरती होणार की नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
अल्प मानधनावर काम
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खासगी कॉन्व्हेटचे पीक आले आहे. याठिकाणी डीएड, बीएड धारक काम करीत आहेत. मात्र संस्था संचालकांकडून त्यांना केवळ दोन ते तीन हजार रुपये मानधन देण्यात येत असल्याचे वास्तव आहे.